मुंबई : आर्थर रोडच्या कारागृह प्रशासनाला जामिनाचा आदेश वेळेत न मिळाल्यामुळे बॉलिवूड किंग शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला शुक्रवारची रात्रही कारागृहातच काढावी लागली. परंतु आता सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यामुळे शनिवारी त्याची सुटका निश्चित आहे. तो परतल्यावर शाहरुखचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यावर दिवाळीचा आनंदोत्सव पहायला मिळणार आहे.
आर्यन खान घरी परत येणार असल्याने आज संध्याकाळी ‘मन्नत’वर रोषणाई करण्यात आली होती. शाहरूखच्या असंख्य फॅन्सनी रात्रीपासूनच निवासस्थान परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आर्यन खानच्या जामिनाचा आदेश आला नाही. त्यामुळे त्याला सोडता येणार नाही. जे सगळ्यांसाठी नियम, तेच आर्यनसाठी लागू असतील.’
बेल बाॅक्समुळे एक रात्र वाढली आर्यनसह इतर तीन आरोपींना कोर्टाने २८ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला; पण जामिनाचा आदेश आणि अटींबाबत शुक्रवारी सविस्तर निकाल दिला. त्यामुळे आर्यनला गुरुवारची रात्र तुरुंगात काढावी लागली होती.आर्थर रोड जेलमधील बेल बॉक्स दिवसातून दोन वेळा उघडण्यात येतो आणि संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जामिनाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच कैद्याला सोडण्यात येते. शुक्रवारी ५.३० वाजेपर्यंत आर्यनच्या जामिनाचा आदेश तुरुंग प्रशासनाला मिळाला नाही. त्यामुळे आणखी एक रात्र तुरुंगातच गेल्याने शनिवारी आर्यनची सुटका होईल.
या आहेत अटीआर्यनसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामीन मंजूर करताना तिघांनाही अटी घातल्या आहेत. एनडीपीएस न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मनाई.विशेष न्यायालयात पासपोर्ट जमा करावेत आणि तपास यंत्रणेच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाऊ नये. प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात आर्यनसह तिघांना हजेरी लावावी. आरोपींवर जो आरोप आहे आणि जो गुन्हा दाखल झाला आहे, त्याच कृत्यात त्यांनी पुन्हा सहभागी होऊ नये. आरोपींनी माध्यमांशी बोलू नये.
जुही चावलाने दिली हमी उच्च न्यायालयाने आर्यन खानची जामिनावर सुटका करण्यासाठी एक लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रकमेचे एक किंवा अधिक हमीदार देण्याची अट घातली. शाहरुखची जुनी मैत्रीण व अभिनेत्री जुही चावला आर्यनसाठी हमीदार राहिली आहे. शुक्रवारी दुपारी न्यायालयात ती उपस्थित होती. जुही चावलाची सही असलेले हमीपत्र न्यायालयाने स्वीकारले.
बच्चा घर आयेगा... ‘बच्चा घर आयेगा’ असे म्हणत जुही चावला हिने तिला होणारा आनंद व्यक्त केला. मला आनंद आहे की, हे सगळे संपले आणि आर्यन लवकरच त्याच्या घरी जाईल. हा सगळ्यांनाच मोठा दिलासा आहे. असे तिने सांगितले.
‘ड्रग्ज पार्टीशी माझा संबंध नाही’ आपला कोणत्याही पॉर्न किंवा ड्रग्ज रॅकेटशी संबंध नाही. क्रूझवर आयोजित कार्यक्रमात फॅशन टीव्ही इंडिया प्रायोजक म्हणून सहभागी झालो होता. मी स्वतः तिकीट घेऊन तिथे गेलो होतो. क्रूझवरील पार्टीचे आयोजक ही दिल्लीतील एक कंपनी आहे. जे आपल्या टीममधीलकाही जणांना भेटले होते. ते कोण आहेत, हे मलामाहीत नाही. आर्यन खानला ओळखत नसून, वानखेडेयांना कधी भेटलो नसल्याचे फॅशन टीव्हीचे प्रमुख काशीफ खान यांनी म्हटले आहे. - संबंधित वृत्त/लोकल व्होकल