Aryan Khan Drugs Case: खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण, भाजपा नेते मोहित कंबोज या प्रकरणाचे मास्टर माईंड, समीर वानखेडेंशी त्यांची मैत्री, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 10:53 AM2021-11-07T10:53:18+5:302021-11-07T10:56:00+5:30
Aryan Khan Drugs Case: मुंबई ड्रग्स केसमध्ये आर्यन खानला अडकवण्यात आले. खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणामध्ये भाजपा नेते Mohit Kamboj हे मास्टर माईंड असून, ते Sameer Wankhede यांचे चांगेल मित्र असल्याचा दावाही Nawab Malik यांनी केला.
मुंबई - मुंबई ड्रग्स प्रकरणाबाबत दिवाळीनंतर मोठा धमाका करण्याचा इशारा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई ड्रग्स केसमध्ये आर्यन खानला अडकवण्यात आले. खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर २५ कोटींची मागणी करण्यात आली. तसेच अखेर १८ कोटींवर तडजोड झाली. त्यातील ५० लाख घेण्यातही आले. मात्र एका सेल्फीमुळे ही डिल फसली, असा दावा मलिक यांनी केला. तसेच या प्रकरणामध्ये भाजपा नेते मोहित कंबोज हे मास्टर माईंड असून, ते समीर वानखेडे यांचे चांगेल मित्र असल्याचा दावाही नबाव मलिक यांनी केला.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधतान नवाब मलिक म्हणाले की, महिनाभरापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी मी काही माहिती तुम्हाला दिली होती. २ ऑक्टोबर रोजी क्रूझवर कारवाई झाल्यानंतर आर्यन खान आणि आठ जणांना अटक झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी मी यावर काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ही कारवाई खोटी असल्याचे सांगितले होते. त्यावेळी दोन जणांने व्हिडीओ आम्ही समोर आणले होते. त्यातील एक केपी गोसावी आणि मनीष भानुशाली होता. हे कोण आहेत असे आम्ही विचारले होते. त्यानंतर एनसीबीने एक स्पष्टीकरण देत ते स्वतंत्र साक्षीदार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी नऊ साक्षीदारांची यादी जाहीर केली होती.
Addressing the press conference. https://t.co/EJyi8ExRAH
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 7, 2021
मलिक पुढे म्हणाले की, क्रूझवरील कारवाईत ११ जणांना पकडण्यात आले. मात्र एनसीबीकडून आठ जणांची नावे समोर आली तर तिघांना सोडण्यात आले. भाजपाचे नेते मोहित कंभोज यांच्या मेहुण्याच्या सांगण्यावरून या तिघांना सोडण्यात आले. या तिघांना सोडण्यामागेच मोठा खेळ आहे. ज्या दिवशी रिषभ सचदेवा याचे नाव समोर आणले त्या दिवशी ११०० कोटींच्या बँक घोटाळ्यातील आरोपी असलेले मोहित कंबोज हे समोर आले. एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले कंबोज सत्ता बदलताच भाजपात गेले. त्यांच्याबाबत ११०० कोटींच्या घोटाळ्याची यादी सीबीआय, ईडीकडे होती. तसेच वर्षभरापूर्वी त्यांच्यावर सीबीआयने धाड टाकली. मात्र नंतर हे प्रकरण दाबण्यात आले, असा आरोप मलिक यांनी केला.
गेल्या महिनाभरापासून मोहित कंबोज तडफडत आहेत. आर्यन खान याला कुणीतरी जहाजावर नेलं, अशी माहिती कोर्टाच्या सुनावणीमध्ये समोर आली होती. त्याने तिकिट काढले नव्हते. प्रतीक गाभा आणि फर्निचरवाला यांच्यासोबच तो तिथे गेला. हे संपूर्ण प्रकरण खंडणीचे आहे. मोहित कंबोज यांच्या मेहुण्याच्या मार्फत सापळा लावण्यात आला. तिथे आर्यन खानला पोहोचवण्यात आले. नंतर त्याचे अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्यात आली. अखेर १८ कोटींवर तडजोड झाली. त्यातील ५० लाख घेण्यातही आले. मात्र एका सेल्फीमुळे ही डिल फसली. या अपहरण आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये भाजपा नेते मोहित कंबोज हे मास्टर माईंड आहेत. अपहरण खंडणीमध्ये ते समीर वानखेडेंचे साथीदार आहेत. ते समीर वानखेडे यांचे चांगेल मित्र आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.