मुंबई - मुंबईतील क्रूझ ड्र्ग्स पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेला शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची अखेर मुक्तता झाली आहे. तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला असून, तिथून तो मन्नत या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाला, मन्नतवर त्याचे जोरदार स्वागत झाले. यावेळी आर्थर रोड तुरुंगाबाहेर शाहरूख खानच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर शाहरुख खानही सकाळी आर्थर रोड तुरुंगामध्ये आला होता. २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आलिशान क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली होती. त्यावेळी एनसीबीने आर्यन खानला ताब्यात घेतले होते. तसेच त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती.
आर्यन खानला गुरुवारी हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र शुक्रवारी जामिनाचे कागद योग्य वेळी तुरुंगात न पोहोचल्याने आर्यन खानची मुक्तता होऊ शकली नव्हती. दरम्यान, आज सकाळी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी जामिनाचे कागद घेण्यासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर आले होते. काल आर्यन खानच्या जामिनाचे कागद याच पेटीत ठेवले होते.
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गुरुवारी जामीन मिळाला होता. मात्र, जामीनासोबतच न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी १४ अटीही घातल्या आहेत. या अटी पुढील प्रमाणे आहेत. १- आर्यनच्या वतीने 1 लाखांचा पर्सनल बाँड जमा करावा लागेल.२ - किमान एक अथवा त्याहून अधिक जामीनदार द्यावे लागतील.३ - NDPS न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही.४ - तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबई सोडता येणार नाही.५ - ड्रग्ससारख्या कुठल्याही अॅक्टिव्हिटीत सापडल्यास तत्काळ जामीन रद्द केला जाईल. ६ - या प्रकरणासंदर्भात मीडिया अथवा सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची वाच्चता करू नये.७ - दर शुक्रवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या कार्यालयात सकाळी 11 ते दोपारी 2 वाजेदरम्यान यावे लागेल.८ - खटल्याच्या नियोजित तारखेला न्यायालयात हजर राहावे लागेल.९ - कुठल्याही वेळी बोलावल्यानंतर एनसीबी कार्यालयात जावे लागणार.१० - प्रकरणातील इतर आरोपी अथवा व्यक्तींसोबत संपर्क अथवा बोलता येणार नाही. ११ - एकदा ट्रायल सुरू झाल्यानंतर यात कुठल्याही प्रकारचा विलंब करणार नाही.१२ - आरोपी असे कुठलेही कृत्य करणार नाही, ज्यामुळे कोर्टाच्या कार्यवाहीवर अथवा आदेशांवर विपरीत परिणाम होईल.१३ - आरोपी वैयक्तिकरित्या अथवा इतर कुणाकडूनही साक्षीदारांना धमकावण्याचा, त्यांना प्रभावित करण्याचा किंवा पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणार नाही.१४ - जर अर्जदाराने/आरोपीने यांपैकी कुठलाही नियम मोडला तर, त्याचा जमीन रद्द करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा NCB कडे अधिकार आहे. NCB न्यायालयात जाऊ शकते.