Aryan Khan Drugs Case : 'भाजप अन् एनसीबी मिळून मुंबईत दहशत माजवतायंत, आठवड्यात पुरावे देणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 04:36 PM2021-10-20T16:36:08+5:302021-10-20T16:36:52+5:30
Aryan Khan Drugs Case : इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर एनसीबी चालत आहे. समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. फोन रेकॉर्डिंग जर रिलीज झाली तर सर्व केस कशा बोगस आहेत.
मुंबई - भाजप, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याची माहितीही मलिक यांनी यावेळी दिली.
इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर एनसीबी चालत आहे. समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. फोन रेकॉर्डिंग जर रिलीज झाली तर सर्व केस कशा बोगस आहेत. मुंबईत जो फर्जीवाडा केलाय तो समोर येईल, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. पूर्वी रेव्ह पार्टी जेव्हा-जेव्हा झाल्या आहेत त्या-त्या वेळी जे संशयित सापडत होते त्यांची रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडले जायचे. त्यानंतर त्यांचा नमुना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून कोर्टात हजर केले जात होते. मात्र, या वर्षभरात एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले किंवा ज्यांना अटक केली त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने घेतलेले नाही. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही.
दरम्यान, फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर त्यांना आरोपी ठरवले जाते आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानेच ते नमुने घेत नसल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.