Aryan Khan Drugs Case : ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर; आर्यनविरोधात पुरावा नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद, आज सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:22 AM2021-10-27T06:22:23+5:302021-10-27T06:23:45+5:30
Aryan Khan Drugs Case: आरोपांच्या चक्रात अडकलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर व बहीण ॲड. यास्मिन मंगळवारी मैदानात उतरल्या.
मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणासंदर्भात मंगळवारी दिवसभर अनेक घडामोडी घडल्या. या प्रकरणातील आरोपी आर्यन खान याच्याविरोधात एनसीबीकडे पुरावे नसल्याने त्याला अटक करायला नको होती, असा युक्तिवाद माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यनची बाजू मांडताना हायकोर्टात केला.
दरम्यान, आरोपांच्या चक्रात अडकलेले एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर व बहीण ॲड. यास्मिन मंगळवारी मैदानात उतरल्या. आम्हाला या प्रकरणात ठार मारण्याचा धमक्या येत असल्याचे क्रांती रेडकर यांनी यावेळी सांगितले.
न्या. नितीन सांब्रे यांच्या एकल खंडपीठापुढे आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आर्यनची एनसीबी अधिकारी व समीर वानखेडे यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही, असे मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. यावर पुढील सुनावणी आज, बुधवारी होणार आहे.
न्यायालयात गर्दी
आर्यनच्या जामिनावर सुनावणी असल्याने न्यायालयात वकिलांनी खूप गर्दी केली. कोरोनाच्या नियमांना न्यायालयातच धाब्यावर बसवण्यात आल्याने न्या. सांब्रे यांनी असोसिएट्सना कोर्ट रूम रिकामी करण्यास सांगितले. त्याशिवाय अन्य याचिकांवरही सुनावणी घेणार नाही, असा पवित्राच न्या. सांब्रे यांनी घेतला.
दोघांची जामिनावर सुटका
दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपी असलेल्या मनीष राजगरीया व अविन साहू या दोघांची विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामिनावर सुटका केली. २ ऑक्टोबर रोजी छापा घालण्यात आलेल्या क्रूझवर हे दोघे ‘पाहुणे’ म्हणून आले होते आणि त्यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले, असे एनसीबीचे म्हणणे आहे.
‘त्याच त्याच प्रश्नांची उत्तरे देऊन वैतागलो’
आम्ही रोज त्याच त्याच प्रश्नांची उत्तरे देऊन वैतागलो आहोत. आम्हाला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तर समीर यांची बहीण ॲड. यास्मिन वानखेडे यांनी मलिक यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात जावे, ट्विट करून लोकांचा वेळ वाया घालवू नये, असा सल्ला दिला.
तपासापासून वानखेडेंना दूर ठेवणार?
पंच साक्षीदार प्रभाकर साईल याने केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी
एनसीबीची तीन सदस्यांची समिती मुंबईत बुधवारी दाखल होत आहे. समीर वानखेडे हे दिल्लीतून रात्री उशिरा मुंबईत परतले. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना क्रूझ प्रकरणाच्या तपासापासून दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. प्रभाकर साईल याला गुरुवारी एनसीबीने पाचारण केले आहे.
मुकुल रोहतगी कोर्टात म्हणाले...
हे प्रकरण ताणले जात आहे कारण काही लोकांचे हित त्यात दडले आहे. नवीन वादांमुळे प्रसारमाध्यमांचे याकडे लक्ष आहे. अन्यथा हे अगदी साधे आहे. कट रचल्याचा किंवा कोणाला प्रवृत्त केल्याचे पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत.
तसेच आर्यनने अमली पदार्थाचे सेवन केले, हे सिद्ध करण्यासाठी कोणतीही वैद्यकीय चाचणी केली नाही. अरबाझ मर्चंटकडे अमली पदार्थ होता, याची माहिती त्याला नव्हती व त्याच्या ते नियंत्रणातही नव्हते.
एनसीबीने व्हाट्सॲप चॅटचा हवाला देत आर्यनला आरोपी करीत त्याच्यावर कटाचा आरोप ठेवल्याचा आरोपही रोहतगी यांनी फेटाळला. एनसीबीने उल्लेख केलेल्या व्हाट्सॲप चॅटचा क्रूझवरील पार्टीचा संबंध नाही. चॅटमध्ये या कार्यक्रमाचा उल्लेख नाही. हे चॅट त्याने १२-१४ महिन्यांपूर्वी एका परदेशी नागरिकाशी केले होते. अरबाझ व अचित कुमार यांच्याशिवाय आर्यन अन्य आरोपींना ओळखतही नाही, असे म्हणत रोहतगी यांनी युक्तिवाद पूर्ण केला.
तपासात आणले जात आहेत अडथळे : एनसीबी
ड्रग्ज प्रकरणी सुरू असलेला तपास दिशाहीन करण्यासाठी हेतूपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू
असून एनसीबीच्या साक्षीदारांवर
प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सुरू
आहेत, असे एनसीबीने आर्यनच्या जामीन अर्जावर दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. एनसीबीने यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
वानखेडेंच्या काळातील २६ कारवाया बोगस
समीर वानखेडे यांनी ड्रग्ज पार्टीसह गेल्या दोन वर्षांत केलेल्या २६ कारवाया बोगस आहेत. खोट्या पुराव्यांच्या आधारे निर्दोष लोकांना अडकवून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत, असा दावा एनसीबीच्याच एका कर्मचाऱ्याने केला आहे.
आरोपांची ही चार पानी जंत्री
माध्यमांसमोर मांडत अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर निशाणा साधला.
तो मी नव्हेच!
पालघर : क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी याचा खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने आर्यन खानच्या सुटकेसाठी मागितलेल्या २५ कोटीतील ३८ लाख आपण सॅम डिसूझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून ज्याचा फोटो दाखविला होता, ती व्यक्ती पालघरमधील हेनिक बाफना असल्याचे उघड झाले आहे.
प्रभाकर साईल याने आपल्या प्रोफाईल फोटोचा दुरुपयोग केल्याची आणि या प्रकरणात आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस
अधीक्षकांकडे बाफना यांनी
केली आहे.