मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात बुधवारी पुन्हा आरोपांची राळ उडवून दिली. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीतील आंतरराष्ट्रीय माफिया हा वानखेडे यांचा मित्र असल्याचा आरोप मलिक यांनी केला, तर वानखेडे यांच्या जन्मदाखला व जात प्रमाणपत्राबाबतचे आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे त्यांनी जाहीर केले.मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विटरवर जारी केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत वानखेडे यांची आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियासोबत मैत्री असल्याचा आरोप केला. क्रुझवरील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पार्टीत आंतरराष्ट्रीय माफिया त्याच्या मैत्रिणीसोबत सहभागी झाला होता. हा दाढीवाला माफिया वानखेडे यांचा मित्र आहे. क्रुझवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास ते सहज समोर येईल. आज तो दाढीवाला मोकाट आहे आणि काही लोकांना प्रसिद्धीसाठी विनाकारण पकडण्यात आले आहे. एनसीबीने त्या दाढीवाल्याला शोधून काढावे, अन्यथा त्याचे नाव आम्ही जाहीर करू, असे मलिक म्हणाले.आर्यन खान ड्रग्ज प्रकरण फ्रॉड आहे. त्यासाठी समीर वानखेडे, वानखेडे यांचे वाहनचालक आणि प्रभाकर साईल यांचा फोन रेकॉर्ड, सीडीआर तपासा. या सीडीआरमधून सर्व घटनाक्रम समोर येईल. याबाबतचे आरोप गंभीर असून एनसीबीने तात्काळ पावले उचलायला हवीत. विशेष म्हणजे क्रुझ पार्टीला राज्याच्या पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नव्हती, असेही नवाब मलिक म्हणाले.फॅशन टीव्हीने राज्य सरकारच्या परवानगीविना व कोविड नियमांचे पालन न करता थेट शिपिंग डायरेक्टरची परवानगी घेऊन पार्टी केली. त्या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया त्याच्या गर्लफ्रेंडसोबत होता. ती हातात रिव्हॉल्व्हर घेऊन उपस्थित होती. तिथल्या रेव्ह पार्टीत नाचताना एक दाढीवाला आहे, तो दाढीवाला कोण हे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना माहीत आहे, असेही मलिक म्हणाले.
‘आरोपांचा धर्माशी संबंध नाही’समीर वानखेडे यांनी चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवली, हे मला समोर आणायचे आहे. त्यांच्या धर्माशी याचा संबंध नाही. एका दलित व्यक्तीची नोकरी वानखेडे यांनी हिसकावून घेतली आहे. या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायला हवी. अशा बोगसगिरीविरोधात ३ ते ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, मला विश्वास आहे की, त्यांची नोकरी नक्की जाईल, असे मलिक म्हणाले. जर एका समीरला असा फर्जीवाडा करून नोकरी मिळत असेल तर १५ कोटी मुस्लिमांना मागासवर्गीय म्हणून अशी नोकरी मिळेल का, असा प्रश्नही नवाब मलिक यांनी केला.
मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप नेते राजभवनावर
राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक हे सरकारी अधिकाऱ्यांना उघडपणे धमकी देत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासणारी ही गोष्ट असून राज्य सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बुधवारी राजभवन येथे भेट घेतली. मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी उपाध्यक्ष आचार्य पवनकुमार त्रिपाठी, अमरजित मिश्र, शरद चिंतनकर आदी नेते उपस्थित होते.