Join us

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, 25 मिनिटे चालली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 8:09 PM

मुंबई पोलिसांची एसआयटी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथित खंडणीचा तपास करत आहे. याच बरोबर, आणखी एक टीम वानखेडे यांच्या कास्ट सर्टिफिकेट संदर्भातही तपास करत आहे. याशिवाय, एनसीबीचे दक्षता पथकही वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे.

अंमली पदार्थ विरोधी संस्था NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये सुमारे 25 मिनिटे बैठक चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांना कास्ट सर्टिफिकेटशी संबंधित चौकशीसंदर्भात बोलावण्यात आले होते. (Aryan Khan Drugs Case)

मुंबई पोलिसांची एसआयटी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथित खंडणीचा तपास करत आहे. याच बरोबर, आणखी एक टीम वानखेडे यांच्या कास्ट सर्टिफिकेट संदर्भातही तपास करत आहे. याशिवाय, एनसीबीचे दक्षता पथकही वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे.

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील NCB पथकाने 2 ऑक्टोबरला क्रूझवर छापा टाकून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, मॉडेल मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट आणि इतरांना ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. यानंतर, सर्वांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने समीर वानखेडे याच्यासह केपी गोसावीवर खंडणीचा आरोप लावला आहे.

एवढेच नाही तर, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही ड्रग्स प्रकरणासंदर्भात अनेक गोष्टींचा संदर्भ देत वानखेडेवर खंडणीचा आरोप केला आहे. तसेच, वानखेडे यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मात्र, वानखेडे यांना अनुसूचित जातीच्या कोट्यातून सरकारी नोकरी मिळाली, जी मुस्लीम व्यक्तीला मिळू शकत नाही. ही फसवणूक आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

टॅग्स :समीर वानखेडेनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोहेमंत नगराळेआर्यन खान