मुंबई-
आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात आता दररोज नवनवे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तर एनसीबीनं केलेला कारवाई फेक असल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. त्यात एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत मलिकांकडून रोज खळबळजनक आरोप केले जात आहेत. त्यात आता आणखी एका दाव्याची भर पडली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB)झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पहिल्या लग्नाचा कथित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी विवाहबंधनात अडकण्याआधी समीर वानखेडे यांचा डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी विवाह झाला होता असा दावा केला जात आहे.
मंत्री नवाब मलिक यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट केला आहे. त्यावर पैचान कोन? असा सवाल केला आहे. तर दुसऱ्या एका ट्विटरमध्ये काही कागदपत्रंही ट्विट करुन 'यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा', असंही मलिक यांनी म्हटलं आहे. यात त्यांनी वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे या संपूर्ण नावाचा उल्लेख केला आहे.
नवाब मलिक यांनी एका ट्विटमध्ये महापालिकेचा एक सर्टिफिकेट ट्विट केलं आहे. तो कागद नेमका कशा संदर्भातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. पण तो ट्विट करताना नवाब मलिक यांनी 'समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा इथूनच सुरू झाला', असं कॅप्शन दिलं आहे. मलिक यांनी ट्विट केलेलं सर्टिफिकेट हे विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, हे सर्टिफिकेट नेमकं कशाचं आहे याला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, नवाब मलिक याच संदर्भात आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे.
कोण आहेत समीर वानखेडे?महाराष्ट्रात राहणारे समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले होते. समीर वानखेडे हे अमली पदार्थां संबंधित प्रकरणांचा छडा लावण्यात तज्ज्ञ मानले जातात. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे १७ हजार कोटींच्या अमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.