मुंबई: ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर आर्यनला दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. पण, आता हे आदेश मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता आर्यन आता खानला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची गरज नाही. या संदर्भात आर्यन खानने न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले.
ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या निर्देशांनुसार आर्यन खानला यापुढे दर आठवड्याला मुंबई एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार नाही. क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडे आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार आर्यनला चौकशी आणि तपासासाठी आवश्यक असल्यास त्याला 72 तास अगोदर नोटीस देऊन बोलावता येईल.
आर्यनने याचिकेत काय म्हटले?10 डिसेंबर रोजी आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि क्रूझमधून ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी जामिनाच्या संबंधित अटींमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली होती. आर्यनच्या अर्जात त्याला दर शुक्रवारी एनसीबीच्या दक्षिण मुंबई कार्यालयात हजर राहावे लागेल या अटीतून सूट मागितली आहे. या अर्जात म्हटले आहे की, तपास आता दिल्ली एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला असल्याने त्याची मुंबई कार्यालयात हजर राहण्याची अट शिथिल केली जाऊ शकते.
अर्जात असेही म्हटले आहे की, एनसीबी कार्यालयाबाहेर पत्रकारांची गर्दी असते, त्यामुळे त्याला प्रत्येक वेळी पोलिसांना सोबत घ्यावे लागते. आर्यनच्या वकिलाने सांगितले की, या याचिकेवर पुढील आठवड्यात हायकोर्टात सुनावणी होऊ शकते. दरम्यान, आर्यन खानला NCB ने 3 ऑक्टोबर रोजी एका क्रूझ जहाजावर छापा टाकून अटक केली होती. त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.