मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आज अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहेत. याचा अर्थ त्यांनी फर्जीवाडा केला आहे. त्यामुळेच ते मुंबई पोलिसांना घाबरत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. आर्यन खान याला गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला. यापूर्वी या प्रकरणातील दोघांना जामीन मिळाला होता. एकंदरीत आज ज्याप्रकारे एनसीबीने युक्तिवाद केला. त्याअगोदरच ही केस किल्ला कोर्टात जामीन देण्यासारखी होती; परंतु एनसीबीचे वकील नवनवीन युक्तिवाद करून लोकांना जास्त दिवस तुरुंगात कसे ठेवता येईल, असा प्रयत्न करत होते. शेवटी उच्च न्यायालयाने जामीन दिला, असेही मलिक म्हणाले.
काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा संबंध काय?क्रूझवर रेव्ह पार्टी होणार होती, असा दावा एनसीबीने केला. या पार्टीमध्ये फॅशन टीव्ही आयोजक होती आणि त्याचा हेड काशिफ खान होता. काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? आजपर्यंत ‘त्या’ दाढीवाल्यावर कुठलीही कारवाई का नाही? याचे उत्तर समीर वानखेडे यांच्याकडून अपेक्षित आहे. क्रूझवरील ड्रग्ज पार्टीला कोणतीही परवानगी नव्हती. विनापरवाना ड्रग्ज पार्टी झाली तर ते क्रूझ का सोडले? क्रूझवरील १३०० लोकांची चौकशी का केली नाही? क्रूझवर अशी पार्टी झाली तर त्या सर्व लोकांना ताब्यात का घेतले नाही? असे प्रश्न उपस्थित करतानाच या सर्व प्रकरणांत आयोजकांवरही प्रश्न निर्माण होतात. पण, आयोजक हा समीर वानखेडे यांचा मित्र असल्यानेच त्याला जाणूनबुजून बाजूला करण्यात आले, असा आरोपही मलिक यांनी केला.
एनसीबीने कायदेशीर समन्स पाठवावेएनसीबीने सोशल मीडिया ट्रायल थांबवून प्रभाकर साईल यांना कायदेशीर मार्गाने समन्स पाठवावे, असे आवाहन त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी केले. साईल यांनी शपथपत्रावर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने बुधवारी मुंबईत येऊन तपास सुरू केला. मात्र, साक्षीदार साईल व के. पी. गोसावी सापडत नसल्याचे सांगत त्यांना हजर राहण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. त्याला आक्षेप घेत ॲड. खंदारे म्हणाले की, एनसीबी ही केंद्रीय तपास यंत्रणा कायदेशीर काम आता करत नाही. त्यांनी मीडिया ट्रायल थांबवावी आणि आम्हाला कायदेशीर समन्स पाठवावे. प्रभाकर साईल चौकशीला सामोरे जातीलच.