Aryan Khan Drugs : ज्ञानदेवचं 'दाऊद' कसं झालं? समीर वानखडेंच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:06 PM2021-10-25T17:06:05+5:302021-10-25T17:08:14+5:30
नवाब मलिक यांचे आरोप फेटाळत समीर वानखेडे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती.
मुंबई - राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते. त्यामुळे, वानखेडे आणि मलिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. आजपर्यंत शांत असलेल्या समीर वानखेडेंच्या वडिलांनीही आता नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय. जावयाला आत टाकल्यामुळेच नवाब मलिक माझ्या मुलाच्या मागे लागलेत, असं ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटलंय. (What is real name of Sameer Wankhede's Father?)
नवाब मलिक यांचे आरोप फेटाळत समीर वानखेडे यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती. माझी खासगी कागदपत्रे अशाप्रकारे ट्विटरवर टाकणे अपमानास्पद असल्याचे म्हणत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनीही झी 24 ताससोबत बोलताना नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे, माझं नाव दाऊद कसं झालं हे मला माहिती नाही. जावयाला आत टाकल्यापासून मलिक समीरच्या मागे लागलाय. तो मंत्री आहे, सरकारच त्याचं आहे, मग तो काहीही करू शकतो. नाव बदलू शकतो, जन्म दाखलाही बदलू शकतो, असे म्हणत ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या वर्तणुकीवर टीका केली आहे.
समीर वानखेडेंचं लग्नाबाबत स्पष्टीकरण
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांच्या वैयक्तीक आरोपांमुळे मी दु:खी आहे. हे माझ्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचे उल्लंघन आहे, असे समीर वानखेडे (Sameer Wankhede) म्हणाले. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे राज्याच्या एक्साईज खात्यातून वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते हिंदू होते. माझी आई दिवंगत झहिदा ही मुस्लिम होती. मी बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे, मला याचा अभिमान आहे. मी 2006 मध्ये डॉ. शबाना कुरेशी हिच्याशी कायदेशीररित्या विवाह केला होता. तसेच 2016 मध्ये कायदेशीररित्या घटस्फोटही घेतला होता. 2017 मध्ये मी क्रांती दिनानाथ रेडकर हिच्याशी विवाह केला, असे वानखेडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. (Aryan Khan Drugs Case)