मुंबई - क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीप्रकरणी गेल्या २५ दिवसांपासून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मंजूर झाला आहे. आर्यनसह ड्रग्ज बाळगणाऱ्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. त्यामुळे, हे तिघेही उद्या किंवा परवा आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. मात्र, आर्यनचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा अधिकार एनसीबीला असल्याचं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
जामीन अर्ज फेटाळण्यासाठी प्रमुख पुरावा पाहिजे, एनसीबीने सत्र न्यायालयात बाजू मांडताना व्हॉट्सअप चॅटचा पुरावा दिला. त्यावरुन, आर्यनचा जामीन फेटाळला गेला. उच्च न्यायालयातही हेच मुद्दे मांडण्यात आले. पण, आर्यन खानतर्फे नामांकीत वकील देण्यात आले होते, त्यांनी युक्तीवाद केला. एनसीबीचा तपास अद्याप संपलेला नाही, त्यामुळे ब्युरोच्या तपासात आणखी काही बाबी पुढे येतील. चार्जशीट दाखल झाल्यानंतर हे समजेल, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. तसेच, साखळी न्यायव्यवस्थेत एखाद्या न्यायलयाने एक निर्णय दिला आणि तो निर्णय वरच्या न्यायालयाने बदलला, तर याचा अर्थ असा होत नाही की, पहिला निर्णय चुकीचा दिला. कारण, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला म्हणजेच तो निकाल आम्ही अंतिम मानत असतो. परंतु, काही वेळेला संबंधित व्यक्तींना सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल पसंत नसतो. पण, कायद्याने तो निकाल मान्य करावाच लागतो.
जामीन हा हक्क आहे, तुरुंग हा अपवाद आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. गुन्ह्याची व्याप्ती, तीव्रता, आरोपींनी केलेल्या गुन्ह्यासंदर्भात तपास यंत्रणांकडे असलेला पुरावा हे जेवढं मजबूत आहे, याचं मुल्यमानप न्यायव्यवस्था करत असते. म्हणूनच, याप्रकरणी, उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तरतूद कायद्याने एनसीबीला उपलब्ध आहे. सर्वोच्च न्यायालयात जाऊन ब्युरो आरोपींचा जामीन रद्द करू शकते, ब्युरो करेल किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
न्यायालयाच्या आदेशाची प्रत आल्यावरच सुटका
आर्यनच्या वकिलांकडून गेल्या तीन दिवसांपासून उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर आज आर्यनसह तिघांना जामीन मिळाला आहे. मात्र, आज जरी जामीन मिळाला असला तरी आजची रात्र देखील आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगात काढावी लागणार आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उद्या उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येण्याची प्रक्रिया सुरु होईल.