नवी दिल्ली - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, याप्रकरणातील पंच असलेल्या किरण गोसावीच्या बॉडीगार्डनेही समीर वानखडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला. त्यानंतर, भाजप नेत्यांनी समीर वानखेडेंच्या बाजुने राज्य सरकारपुढे प्रश्न उपस्थित केले. त्यातच, आता वानखेडे कुटुंबीयांनी भाजपा नेते किरीट सोमैय्यांची भेट घेतली आहे.
आर्यन खान ड्रग्जप्रकरण वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचले आहे. एकीकडे आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे वानखेडे विरुद्ध मलिक यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. त्याच पार्श्वभूमी वानखेडे कुटुंबीय संतप्त झाले असून बुधवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वच आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर, आज भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांची भेटही घेतली. पत्नी समीर वानखेडे, वडिल ज्ञानदेव वानखेडे आणि बहिणी यास्मीन वानखेडे यांनी किरीट सोमय्यांशी चर्चा केली. त्यावेळी, संपूर्ण महाराष्ट्र तुमची माफी मागतो, असे सोमय्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसारच नवाब मलिक वानखेडे कुटुंबीयांवर चिखलफेक करत असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच, “शरद पवार यांनी पेड मीडियाचा वापर करून माध्यमातील चर्चा समीर वानखेडे दलित आहेत की मुस्लीम आहेत यावर नेली. परंतु, आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आयकर विभागानंतर ईडी चौकशी करत होती. आम्हीही अनेक पुरावे दिले होते. आयटीलादेखील अनेक गोष्टी सापडल्या. १०५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती प्रकरणी आता ईडी पण मागे लागलीय,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
“12 दिवसांपासून महाविकास आघाडीचा कॅबिनेट मंत्री एवढा चिखल उडवतोय. त्या क्रुझबाबत पैशांचा व्यवहार झाला असेल तर उच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल आहे. शाहरूख खानने नकार दिला तर नवाब मलिक, उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करायला हवं होतं. अशाप्रकारे चिखलफेक करून एखाद्याचं व्यक्तिगत आयुष्य बिघडवून त्यांना काय साधायचं आहे? देव त्यांना क्षमा करो.”, असे सोमय्यांनी म्हटले आहे. सोमय्यांची वानखेडे कुटुंबीयांनी भेट घेतल्यावर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.