मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडेने आपल्याला गांजा पुरविल्याची माहिती आर्यन खानने दिल्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या पांडे हिला चौकशीसाठी बोलविले होते. त्यावेळी तिने आरोप फेटाळले. मी आर्यनला गांजा पुरविला नाही. तो खोटे बोलत असल्याचा दावा तिने एनसीबीकडे केला. एनसीबीने तिचाही जबाब आरोपपत्रासोबत जोडला आहे.
अनन्याने तिच्या लहान बहिणीला गांजा ओढताना पकडले. ती नियमित गांजाचे सेवन करत नाही. पालकांपर्यंत ही बाब पोहचू नये, यासाठी तिने गांजाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मला दिला, असे आर्यनने एनसीबीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. याबाबत अनन्याकडे एनसीबीने चौकशी केली. आर्यनची आणि माझी लहानपणापासून मैत्री आहे. आमच्या पालकांतही मैत्री आहे.
२०१९ पर्यंत आमच्यात घट्ट मैत्री होती. त्यानंतर आम्ही कामात गुंतलो आणि एकमेकांपासून दूर झालो. तरीही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. कधीतरी एकमेकांशी गप्पा करतो, असे सांगत मी कधीच कोणालाही ड्रग्स दिले नाही. मी ड्रग्ससाठी कोणालाही पैसे दिले नाहीत. मी ड्रग्सची विक्री करण्याच्या व्यवसायात नाही. मला ड्रग विक्रेत्याचीही माहिती नाही, अशी माहिती अनन्याने एनसीबीला दिली.
‘चॅटमधील संपूर्ण संभाषण म्हणजे मस्करी’
आर्यनबरोबर करण्यात आलेल्या चॅटसंदर्भात तिच्याकडे विचारणा केल्यावर तिने एनसीबीला सांगितले की, ते संपूर्ण संभाषण एक जोक होता. मी कधीच ड्रग्सचे सेवन केले नाही, खरेदी किंवा विक्री केली नाही. त्यामुळे थोडी मस्करी करण्यासाठी मी तसे म्हटले. तसेच आर्यनने ‘मी तुझ्याकडून गुप्तपणे ड्रग्स घेईन, असे जे चॅटमध्ये नमूद केले आहे, ते मला चिडवण्यासाठी म्हटले आहे. आर्यन आणि मी एकत्रपणे धूम्रपान आणि मद्यपान केले आहे. मात्र, आम्ही कधीच एकत्रपणे ड्रग्स घेतले नाही, असे अनन्याने स्पष्ट केले.