मुंबई- कर्करोगाशी लढा देत विलेपार्लेच्या पार्ले टिळक शाळेचा विद्यार्थी आर्यन रहाटे याने आयसीआयसी बोर्डाच्या परिक्षेत 96.5 टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. आर्यनला गेल्यावर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ताप आला होता.
तपासणी नंतर त्याला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. या दुर्धर आजाराशी लढा देत त्याने घरी अभ्यास करत कठोर परिश्रम घेत परीक्षा दिली.चक्क त्याने तीन पेपर शाळेतून तर तीन पेपर सांताक्रूझच्या सूर्या रुंग्णालयाच्या बेड वरून दिले. आलेल्या संकटाशी सामना करत त्याने हे घवघवीत यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
शिवसेनेने आर्यनच्या यशाला केला सलाम
आर्यन रहाटे या विद्यार्थ्यांने ब्लड कॅन्सरशी झुंज देऊन दहावीच्या परीक्षेत 96.5% गुण मिळवल्याबद्धल शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर व महिला शाखा संघटक अपर्णा उतेकर यांनी त्याच्या येथील शहाजी राजे रोड वरील त्याच्या घरी जावून त्याच्या या घवघवीत यशाला सलाम केला.
पार्लेकर आर्यनचे हे घवघवीत यश भविष्यकाळात अनेकांचे प्रेरणा स्रोत्र ठरणार यात शंकाच नाही. कोणत्याही विपरीत परिस्थितीत विचलित न होता आपल्या इच्छा शक्तीच्या बळावर आपले लक्ष्य साध्य करणे हे आर्यनने जगाला दाखवून दिले. लढवय्या आर्यन आणि त्याला खंबीरपणे साथ देणारे त्याच्या पालकांना शिवसेनेने मनाचा मुजरा केला.