भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंनी गेल्या महिन्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली. त्यावेळी, अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागतही करण्यात आलं. मात्र, त्यानंतर काही दिवसांत पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाने १९ कोटी रुपयांच्या जीएसटीप्रकरणी नोटीस बजावली. त्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत सापडल्या आहेत. एकीकडे ही आर्थिक समस्या असताना दुसरीकडे राजकीय जीवनातही त्यांचा संघर्ष सुरूच आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यापासून त्या वेटिंगवरच आहेत.
पंकजा मुंडेंची भाजपमध्ये होणारी घालमेल अनेकदा त्यांच्या समर्थकांचा संयम सोडायला भाग पाडते. म्हणूनच, यापूर्वी पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरुन भाजपचा निषेध केला होता. तर, नुकतेच त्यांच्या समर्थकांनी या वैद्यनाथ साखर कारखान्यावरील कारवाई विरोधात रस्त्यावर उतरत वर्गणी जमा करण्यास सुरूवात केली. तसेच, दिवंगत गोपीनाथ मुंडेंसोबत राजकारणात सक्रीय झालेले अनेकजण त्यांच्या आजच्या परिस्थितीवर भाष्य करनाता भाजपला लक्ष्य करतात. त्यात, आमदार एकनाथ खडसे हेही आक्रमक होतात. तर, इतर नेतेही पंकजांबद्दल सहानुभूती व्यक्त करतात. आता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंकजा आणि प्रितम मुंडेंची बाजू घेत भाजपला लक्ष्य केलं.
पंकजाताई अनेकवेळा पवारसाहेबांना भेटायला यायची, त्यावेळी आम्ही कधीही राजकारण केलं नाही. मला खरंच त्या मुलीबद्दल प्रेम वाटतंय, याचं कारण असं की, ती एकटी लढतेय. तिचे वडिल गेलेले आहेत. त्यांच्या घरात कोणता कर्ता पुरुष नाही. १९९५ साली भाजपची सत्ता आली, तेव्हा दोन नेत्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस सरकारविरुद्ध रान पेटवलं होतं आणि ते सत्तेत आले होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे, आज दोघेही हयात नाहीत. मात्र, भाजपा कोणत्या पद्धतीने आज त्यांच्या मुलींना वागवतेय, असा सवाल करत सुप्रिया सुळेभाजपावर चांगल्याच कडाडल्याचं दिसून आलं.
बेटी पढाओ, बेटी बचाओ म्हणता ना, आधी ह्या दोन आमच्या बेट्यांचं करा. तुम्हाला जमत नसेल तर मोठी बहीण म्हणून मी करेन, असे म्हणत त्यांचं पुनर्वसन करावं किंवा त्यांना कुठेतरी सत्तेत स्थान द्यावं असं सुप्रिया सुळे यांनी सूचवल्याचं दिसून येतं. त्या दोन्ही नेत्यांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. प्रमोद महाजन आणि आमचे ऋणानुबंध, ते माझ्या जन्मापासून आमच्या घरी येत होते. तर, गोपीनाथ मुंडे यांनीही शुन्यातून विश्व निर्माण केलं होतं. ही दोन्ही मराठमोळी मुले आहेत, त्या दोघांनीही दिल्ली गाजवली. भाजपा ते विसरला असेल, पण मी विसरणार नाही. कारण, माझ्या महाराष्ट्रात त्यांचा जन्म झालाय, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.