आजोबा म्हणून 'किआन'ला शिवरायांच्या कोणत्या गोष्टी सांगाल? राज ठाकरे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 11:29 PM2022-10-16T23:29:31+5:302022-10-16T23:33:10+5:30
'हर हर महादेव' सिनेमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हाइस ओव्हर दिला आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.
मुंबई-
'हर हर महादेव' सिनेमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हाइस ओव्हर दिला आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज सुबोध भावे यानं राज ठाकरे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलासपणे उत्तरं दिली. शिवाजी महाराज, गड, किल्ले, पुस्तकं यांच्याशी जवळीक कशी झाली आणि शिवरायांच्या विचारांनी आपण कसं भारावून गेलो यावर राज ठाकरेंनी मनमोकळेपणानं गप्पा मारल्या. यातच सुबोध भावेनं राज ठाकरे यांचे नातू किआन याच्याबाबतीत विचारलेल्या प्रश्नानंही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
'शिवनेरीवर गेलो होतो, अचानक एक हात खांद्यावर आला अन्...' राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
छत्रपती शिवाजी महाराज सध्याच्या पिढीत सर्वप्रथम गोष्टीच्या माध्यमातून समोर येतात किंवा गोष्टीतूनच त्यांची ओळख होते. आता तुम्ही आजोबा झालेले आहात. मग किआनला महाराजांच्या गोष्टी सांगतात अशी कोणती गोष्ट आहे की ज्यापासून तुम्ही शिवरायांची कथा सांगण्यास सुरुवात कराल?, असा प्रश्न सुबोध भावेनं राज ठाकरे यांना विचारला. राज यांनी मिश्किलपणे त्यावर उत्तर दिलं.
'चित्रपटाला आवाज देणं सोपं नव्हतं, पण शिवरायांचा चित्रपट म्हणून आवाज दिला'-राज ठाकरे
"मुलगा असल्यामुळे आणि त्यात ठाकरे असल्यामुळे लढायाच सांगाव्या लागतील असं मला वाटतंय", असं राज ठाकरे मिश्किलपणे म्हणाले आणि एकच हशा पिकला. पण त्यानंतर राज यांनी मुलांवर गोष्टींच्या माध्यमातून होणारे संस्कार स्पष्ट करताना रामायण आणि महाभारताचं महत्व पटवून दिलं. "किआन मोठा झाला की त्याला महाराजांनी कसा शब्दकोश बनवला होता वगैरे इतर गोष्टी सांगेन. पण शेवटी छत्रपतींना जिजाऊंनी देखील रामायण, महाभारताच्याच कथा ऐकवल्या. त्यामुळे तो जो संस्कार आहे तो पुढे चालू ठेवणं हेही महत्वाची गोष्ट आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा
छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन ते तीन भागांत भव्य दिव्य सिनेमा घेऊन येतोय, त्यावर सध्या काम सुरू आहे, असंही राज ठाकरे यांनी या मुलाखतीतून जाहीर केलं. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग घेऊन त्यावरच सिनेमा करणं म्हणजे त्या माणसावर अन्याय करण्यासारखं आहे असं मला वाटतं. मग माझ्या मनात आलं की टेलिव्हिजन सीरिअल करू, त्यासंदर्भात माझं आशुतोष गोवारीकर यांच्याशी बोलणं झालं. त्यावेळी तिथं नितीन चंद्रकांत देसाई तिथं होते. त्यांनी त्यात रस दाखवला आणि त्यांनी त्यावर काम सुरू केलं. ती सीरिअल येऊनही खूप वर्ष झाली. आता सर्व प्लॅटफॉर्म बदलले आहे. सध्या माझं त्यावर काम सुरू आहे. आताच मी तुम्हाला कुणाकडे काम दिलंय वगैरे या सगळ्या गोष्टी सांगत नाही. पण दोन ते तीन भागांत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणायचा माझा विचार सुरू आहे. आता त्याबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही. ते झालं की सविस्तर बोलूच", असं राज ठाकरे म्हणाले.