Join us  

बाळासाहेबांनी मणिशंकरांच्या थोबाडीत दिली होती, तशी तुम्ही राहुल गांधींच्या...; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 4:53 PM

राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला असून मी त्याचा निषेध करतो. ते म्हणाले मी सावरकर नाही, पण सावरकर व्हायची तुमची लायकीही नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप त्यांच्यावर टीका करत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही यावर नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या जाहीर सभेतून राहुल गांधींना ठणकावलं आहे, आम्ही सावरकरांचा अवमान कदापि सहन करणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तर, ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या डिनर पार्टीवरही बहिष्कार टाकला आहे. त्यातच, आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला असून मी त्याचा निषेध करतो. ते म्हणाले मी सावरकर नाही, पण सावरकर व्हायची तुमची लायकीही नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. तसेच, उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे काय? तुम्ही भाषणात जाहीरपणे म्हटले की, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, म्हणजे नेमकं काय करणार?. बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत दिली होती, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी फोटोही दाखवला. तसेच, सगळीकडून दबाव येत असल्याने, उशिरा सूचलेलं हे शहाणपण असल्याचही शिंदेंनी म्हटलं. दरम्यान, त्यावेळी, २००४ मध्ये बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यर यांच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन केले होते. आता, तुम्हीही राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

 

तेव्हा बाळासाहेबांनी केलं होतं आंदोलन

सन २००४ मध्ये मणिशंकर अय्यर जेव्हा पेट्रोलियम मंत्री होते, तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक विधान केलं होतं. तसेच, काँग्रेस सरकारने अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातून वीर सावरकर यांच्या विधानांच्या उश्याही काढून टाकल्या होत्या. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्याविरुद्ध जोडे मारो आंदोलन केले होते. शिवसेना पहिल्यापासूनच सावरकर यांच्याबद्दल कायमच संवेदनशील आणि भावनिक असल्याचा इतिहास आहे. 

काय म्हणाले होते राहुल गांधी

राहुल गांधींना पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारला होता. कोर्टाच्या म्हणण्यानुसार तुम्ही माफी का मागितली नाही. त्यावर, मी सावकर नाही, मी गांधी आहे, मी माफी मागणार नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल गांधींच्या या विधानावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, तरी शिवसेना ठाकरे गट गप्प असल्याची टिका उद्धव ठाकरेंवर होत आहे.    

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेनाराहुल गांधी