मुंबई : महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे जाहीर केल्यामुळे १४ दिवसांत तब्बल दीड हजार कोटींहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. पालिकेने मागील काही दिवसांपासून मालमत्ता कर वसुलीसाठी मोठ्या थकबाकीदारांकडे पाठपुरावा करण्यास सुरूवात केली आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत बुधवारी दुपारपर्यंत २४ प्रशासकीय विभाग आणि एक शासकीय मालमत्ता याद्वारे एकूण २ हजार २१३ कोटी ८८ लाख ५७ हजार रुपयांच्या कराची रक्कम वसूल करण्यात आली आहे. पालिकेचे २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी साडेचार हजार कोटी रुपये मालमत्ता कर वसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे मुंबईकरांनी येत्या ४ दिवसात मालमत्ता कर भरून पालिकेला उद्दिष्टपूर्तीसाठी मदत करावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर -
नागरी विकासात मालमत्ता कराचे योगदान महत्त्वाचे असून, पालिकेच्या महसुली उत्पन्नाचा हा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे प्रयत्न सुरू आहेत.
१) मालमत्ता कराची सुधारित देयके मालमत्ताधारकांना पाठवताच कर भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांत नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. काही मालमत्ताधारकांनी अद्यापपर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही.
२) साडेचार हजार कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेचीही दमछाक होताना दिसत आहे. पालिकेने थकबाकीदारांकडे वैयक्तिक पद्धतीने पाठपुरावा सुरू केला आहे. उर्वरित ४ दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.