चिअर्स, पारा वाढला; मद्याचा प्याला चढला!, विदेशी मद्याच्या विक्रीचाही विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:03 PM2022-05-23T12:03:39+5:302022-05-23T12:04:12+5:30
गेल्या काही दिवसांत बिअरच्या मागणीत झाली मोठी वाढ.
हितेन नाईक
मुंबई : कडक उन्हामुळे घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या उकाड्यावर अनेकांनी मद्याची मात्रा शोधून काढली असून, गेल्या काही दिवसांत बियरची मागणी वाढली आहे. देशी आणि विदेशी दारूच्या विक्रीतही कोरोनाच्या तुलनेत वाढ झाली आहे.
उष्णतेच्या लाटेपासून काही काळ सुटका होण्यासाठी अनेक नागरिकांनी शीतपेयांचा आधार घेतला आहे. यात बिअरचाही मोठा वाटा असून, २०२१-२२ मध्ये राज्यभरात २३१२.८१ लाख लीटर बिअर विक्री झाली. २०२०-२१ मध्ये २०११.९३ लाख लीटर बिअर विकली गेली. वर्षभरात त्यात १४.९५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
शासनाचा महसूल वाढला
गेल्या दहा वर्षांत प्रत्यक्ष मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा विविध कारवाया आणि करवसुलीतून मिळणारे उत्पन्न अधिक आहे. म्हणजे २०१२-१३ या आर्थिक वर्षात ८०.५५ कोटी लीटर मद्यविक्री झाली, तर ९ हजार २९७ कोटी रुपये महसूल शासकीय तिजोरीत जमा झाला होता. त्या तुलनेत २०२१-२२ मध्ये केवळ ८२.४ कोटी लीटर दारू विकली गेली आणि १७ हजार १७७ कोटी रुपये महसूल मिळाला. विविध प्रकारचे परवाने, मद्यावरील कर, मद्य तस्करी, तसेच बनावट मद्यावरील कारवाईतून हा अतिरिक्त महसूल जमा झाला आहे.
‘देशी’ची मागणी अधिक
इतर मद्यांच्या तुलनेत देशी दारू पिणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. २०२०-२१ मध्ये राज्यात ३२०८.०६ लाख लीटर देशी मद्य विकले गेले. त्या तुलनेत २०२१-२२ मध्ये ३४८३.०८ लाख लीटर देशी दारूची विक्री झाली.
२३ कोटी लिटर विदेशी रिचवली
एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा जोर सुरू असताना २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील तळीरामांनी तब्बल २३.५८ कोटी लिटर विदेशी दारू रिचवली आहे. गेल्या दहा वर्षांत वाईन विक्रीतही वाढ झाली आहे.
कोणत्या दारूची किती विक्री? (कोटी लिटर)
वर्ष | देशी | विदेशी | बिअर | वाईन |
२०१९-२० | ३५.०३ | २१ | २९.०३ | ०.७० |
२०२०-२१ | ३२.०८ | १९.९९ | २०.१२ | ०.७१ |
२०२१-२२ | ३४.८३ | २३.५८ | २३.१३ | ०.८६ |