Join us

Video: फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, आम्ही नाक कापणार; राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 8:01 PM

नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत झालं, त्यानंतर मोदींनी काळाराम मंदिराला भेट दिली.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदीं नाशिकमधील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मोदींच्या या दौऱ्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना येथील कांदा उत्पादित शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर बोचऱ्या शब्दात टीका केली. 

नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत झालं, त्यानंतर मोदींनी काळाराम मंदिराला भेट दिली. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले, आनंद आहे. पण दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ काढून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही त्यांनी भेटायला पाहिजे होतं, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं. तर, माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.  देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊतांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली. ''देवेंद्र फडणवीस हे सध्या शूर्पणखेच्या भूमिकेत शिरले आहेत, ते अनेक मायावी रुपं घेतात आणि महाराष्ट्राला गुमराह करतात. पण, नाशिकला शिवसेनेचं शिबीर आणि अधिवेशन होत आहे, ते यासाठीच की, आम्हाला २०२४ साली या शूर्पणखेचं नाकच कापायचं आहे,'' असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली.  

दरम्यान, संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका करताना, आम्ही वाघच आहोत. म्हणूनच, कोण आले रे.. कोण आला... शिवसेनेचा वाघ आला असं म्हणतात. शिंदे गटाचा किंवा भाजपाचा वाघ आला असं कोणीही म्हणत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखे जगायला शिकवलं, असेही राऊत म्हणाले. यावेळी, बाबरी मशिद व राम मंदिर आंदोलनावरुनही त्यांनी भाजपला लक्ष्य केलं.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामुंबईदेवेंद्र फडणवीसनाशिक