Join us

काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल १,६३३ अर्ज; विधानसभेसाठी सर्वाधिक अर्ज विदर्भ, मराठवाड्यातून

By दीपक भातुसे | Published: September 16, 2024 7:32 AM

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे केवळ ४७६ अर्ज आले होते, आता ती संख्या चौपट झाली आहे.

दीपक भातुसे

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे काँग्रेसकडे विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. काँग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागवले होते. काँग्रेसकडे १,६३३ अर्ज आले असून, सर्वाधिक अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातील मतदारसंघांसाठी आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे केवळ ४७६ अर्ज आले होते, आता ती संख्या चौपट झाली आहे.

सत्ताधारी पक्षाचे सदस्यही काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र त्यांची नावे आताच समोर आणली जाणार नाहीत, असे पक्षातील एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

९० ठिकाणी आघाडीवर

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी १३ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

२८८ मतदारसंघांपैकी ९० विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर असून, विदर्भ आणि मराठवाड्यात काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे.  

गुणवत्तेच्या आधारे निश्चित होणार उमेदवार

काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक असले तरी मतदारसंघातील गणित लक्षात घेऊन गुणवत्तेच्या आधारे उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. मात्र पक्षाकडे एवढ्या संख्यने अर्ज आल्याने ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते बंडखोरी करण्याची भीतीही पक्षाला वाटत आहे.

काँग्रेसकडे आलेले अर्ज

विदर्भ   ४८५

मराठवाडा       ३२५

पश्चिम महाराष्ट्र ३०३

मुंबई   २५६

उत्तर महाराष्ट्र    १४१

कोकण  १२३

टॅग्स :काँग्रेस