राज्यात तब्बल 2 हजार 375 चार्जिंग स्टेशन होणार सुरू, इंधनाच्या वाढत्या किमतीला पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:52 AM2022-06-21T10:52:54+5:302022-06-21T10:53:31+5:30
Charging Stations: राज्यात महावितरणने १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू केली असून, विविध ठिकाणी २ हजार ३७५ स्टेशन्स प्रस्तावित आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात स्वीकारली जात आहे.
मुंबई : राज्यात महावितरणने १३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरू केली असून, विविध ठिकाणी २ हजार ३७५ स्टेशन्स प्रस्तावित आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणात स्वीकारली जात आहे. या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहनधारकांना त्यांच्या वाहनांच्या चार्जिंगची व्यवस्था सहजतेने उपलब्ध व्हावी, यासाठी ही व्यवस्था उभी केली जात आहे.
शासनाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२१ हे २३ जुलै २०२१ रोजी जाहीर केले आहे. त्यानुसार २०२५ पर्यंत राज्यातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पायाभूत सुविधेनुसार मुंबई १५००, पुणे शहर ५००, नागपूर शहर १५०, नाशिक शहर १००, औरंगाबाद शहर ७५, अमरावती ३०, सोलापूर २० अशी एकूण २,३७५ तसेच, समृद्धी महामार्ग मुंबई-नागपूर, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग मुंबई-पुणे, मुंबई- नाशिक, नाशिक-पुणे हे पूर्णत: इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांनी सज्ज करण्यात येणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले.