तब्बल ४० मिनिटे ‘त्या’ रिकाम्या विमानातच; इंडिगोला दिव्यांग प्रवाशाचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 09:28 AM2023-12-08T09:28:55+5:302023-12-08T09:29:15+5:30
विराली मोदी या ५ डिसेंबर रोजी इंडिगोच्या विमानाने मुंबईत आल्या. विमानातून सर्व प्रवाशांसह कर्मचारीही उतरले. मात्र, त्यांना उतरण्यासाठी मदत केली नाही
मुंबई : दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या विराली मोदी (३२) यांना अलीकडेच विमान प्रवासात धक्कादायक अनुभव आला. दिल्लीहून निघालेले त्यांचे विमान मुंबई विमानतळावर पोहोचले. मात्र, त्यांना विमानातून उतरण्यासाठी तसेच व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यासाठी कोणीही आले नाही. त्यामुळे रिकाम्या विमानात त्यांना तब्बल ४० मिनिटे विमानातच बसून राहावे लागले. सोशल मीडियावरून विराली यांनी हा अनुभव कथन केला.
विराली मोदी या ५ डिसेंबर रोजी इंडिगोच्या विमानाने मुंबईत आल्या. विमानातून सर्व प्रवाशांसह कर्मचारीही उतरले. मात्र, त्यांना उतरण्यासाठी मदत केली नाही किंवा व्हीलचेअरही दिली नाही. विमानातून उतरवून घेण्यासाठी असलेल्या बटणापर्यंत त्यांचा हात पोहोचत नव्हता. त्यामुळे ४० मिनिटे त्या रिकाम्या विमानातच बसून राहल्या. सफाई कर्मचारी विमानात आल्यावर विराली यांना विमानातून उतरविण्यात आले.
दिलगिरीही नाही
घरी आल्यानंतर विराली मोदी यांनी इंडिगो कंपनीच्या कॉल सेंटरला फोन केला. मात्र, प्रतिनिधीशी बोलण्यासाठीही ५५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर इंडिगोच्या प्रतिनिधीने त्यांना या घटनेची माहिती देणारा केवळ एक ई-मेल करण्यास सांगितले. यासंदर्भात कंपनीने साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही.