तब्बल ४३,००,०००! मे महिन्यात मुंबई विमानतळावर प्रवासी संख्येचा उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2023 06:35 AM2023-06-17T06:35:59+5:302023-06-17T06:36:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विमान प्रवासावर पसरलेले कोरोनाचे सावट धूसर होऊ लागताच प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. एकट्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विमान प्रवासावर पसरलेले कोरोनाचे सावट धूसर होऊ लागताच प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. एकट्या मुंबईविमानतळावरून मे महिन्यात तब्बल ४३ लाख लोकांनी देश-परदेशात प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार, मे महिन्यात सुट्ट्यांचाही मोसम असल्यामुळे अनेकांनी पर्यटनासाठीदेखील विमान प्रवासाला पसंती दिली. याची परिणती प्रवासी संख्या वाढण्याच्या रूपाने दिसून आली.
सरत्या महिन्यात एकूण २१ लाख प्रवासी मुंबईत आले तर २२ लाख प्रवाशांनी मुंबईतून प्रयाण केले. एप्रिल २०२३ च्या तुलनेत मे २०२३ मध्ये झालेली ही वाढ ८ टक्के इतकी आहे. तर मे २०२२ च्या तुलनेत ही वाढ २३ टक्के इतकी झाली आहे. २७ मे रोजी मुंबई विमानतळावर १ लाख ५१ हजार ३५६ इतक्या सर्वाधिक प्रवाशांची नोंद झाली आहे. तर मे महिन्यात मुंबई विमानतळावर एकूण २६ हजार ५२ विमानांची वाहतूक झाली.
प्रवाशांची पसंती कुठे?
- देशांतर्गत प्रवासासाठी प्रवाशांनी दिल्ली, बंगळुरू, गोवा, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता, जयपूर, कोचीन, चंडीगड या ठिकाणांना पसंती दिली.
- आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी दुबई, आबुधाबी, सिंगापूर, लंडन, दोहा, बँकॉक, मस्कत, कुवेत, इस्ताम्बूल आदी ठिकाणांना पसंती दिली आहे.
कोणत्या विमान सेवांना पसंती?
पहिला क्रमांक प्राप्त केला आहे तो इंडिगो विमान कंपनीने. त्याखालोखाल एअर इंडिया, विस्तारा, अकासा, स्पाइसजेट, एअर एशिया इंडिया यांचा क्रमांक आहे.
३६% - मुंबईतून लोकांनी मध्य आशियातील देशांना भेट दिली.
२२%- लोकांनी ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण केले.