Join us  

तब्बल ५,४८९ किलो अमली पदार्थ नष्ट; एकूण मुद्देमाल ५२ कोटींचा, एनसीबीची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 6:56 AM

या एकूण अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे कोकेनचा समावेश असलेल्या द्रवपदार्थांचे होते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाने गेल्या काही कालावधीमध्ये विविध कारवायांदरम्यान जप्त केलेले तब्बल ५४८९ किलो अमली पदार्थ गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन दिवसांत नष्ट करण्यात आले. नष्ट केलेल्या या अमली पदार्थांची किंमत ५२ कोटी रुपये इतकी आहे.

या एकूण अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे कोकेनचा समावेश असलेल्या द्रवपदार्थांचे होते. याच्या एकूण ५२ हजार १३० बाटल्या विविध कारवायांदरम्यान जप्त करण्यात आल्या होत्या. त्याचे वजन ५४७९ किलो इतके होते. हे अंमली पदार्थ प्रामुख्याने धारावी व ठाणे येथून जप्त करण्यात आले होते. मुंबईतून हे अमली पदार्थ रस्तामार्गे, रेल्वेमार्गे बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यात आणि देशात विविध ठिकाणी वितरित करण्यात येत होते.

लॅटिन अमेरिका ते भारत प्रवास

एनसीबी कारवाई दरम्यान १० किलो कोकेनही जप्त करण्यात आले असून ते लॅटिन अमेरिकन देशातून भारतात आले होते. तळोजा येथे अमली पदार्थ नष्ट करण्याचे सुविधा केंद्र असून तिथे हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एनसीबीचे उप-महासंचालक मनीष कुमार, अतिरिक्त विभागीय आयुक्त अमित घावटे, मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र शिरतोडे उपस्थित होते.

टॅग्स :अमली पदार्थनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो