Join us  

राज्यात साथीच्या आजारांचे ८ महिन्यांत तब्बल ५७ बळी, आजार अंगावर न काढता उपचार घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 1:26 PM

Health News: राज्यात साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असून, गेल्या आठ महिन्यांत ५७ रुग्णांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ‘इन्फ्लुएंझा ए’, तर त्यापाठोपाठ डेंग्यूच्या आजाराचे आहेत.

 मुंबई - राज्यात साथीच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असून, गेल्या आठ महिन्यांत ५७ रुग्णांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे ‘इन्फ्लुएंझा ए’, तर त्यापाठोपाठ डेंग्यूच्या आजाराचे आहेत. साथीच्या आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विशेष म्हणजे, कुठलाही ताप आला तर रुग्णांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, असे सांगण्यात येत आहे.

सध्या राज्याच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे कीटकजन्य आणि जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तर, काही नागरिकांना संसर्गजन्य आजारांची बाधा झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत उपचार घेणे गरजेचे असते. काही वेळा रुग्ण ताप येत असल्यामुळे स्वत:च्या मनाने उपचार घेतात. मात्र, त्यावेळी योग्य आजाराचे निदान न झाल्यामुळे गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते.

वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश साथीच्या आजारांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पोटदुखी यांसारखी काही समान लक्षणे आढळून येतात. मात्र, त्या रुग्णांची डॉक्टरांनी योग्य तपासणी आणि काही चाचण्या केल्यानंतरच नेमका कोणता आजार झाला आहे, याचे निदान करता येते. मात्र, काही वेळेला रुग्ण आजार अंगावरच काढतात. त्यानंतर परिस्थिती गंभीर झाली की डॉक्टरकडे येतात. त्यामुळे रुग्णांनी वेळेतच डॉक्टरांकडे येऊन उपचार घेतल्यास आजार बरा होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

टॅग्स :आरोग्यहॉस्पिटल