Join us

आयपीओतून लाटले तब्बल ८० कोटी, तक्शीलची १२ कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 8:54 AM

देशाबाहेरील कंपन्यांत वळवले होते पैसे

मुंबई :  प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातून लोकांकडून ८० कोटी रुपये जमा करत त्या पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) कंपनीच्या तीन संचालकांची १२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये स्थावर अचल मालमत्तेचा समावेश आहे. या मालमत्ता मुंबई व हैदराबाद येथे असल्याचे समजते.

या घोटाळ्याप्रकरणी भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने ईडीकडे तक्रार दाखल केली होती. उपलब्ध माहितीनुसार, निर्मल कोटेचा, पवन कुचाना आणि किशोर तापडीया या तिघांनी या कंपनीच्या विस्ताराचे कारण देत शेअर बाजारातून पैसे उभे करण्यासाठी कंपनीच्या १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ५५ लाख समभागांची विक्री १५० रुपयांना केली. याद्वारे कंपनीने ८० कोटी ५० लाख रुपये जमा केले होते. कंपनीच्या समभाग विक्रीला जास्त प्रतिसाद मिळवण्यासाठी कंपनीने अमेरिका व सिंगापूर येथील कंपन्यांतून तक्शील कंपनीचे व्यवहार केल्याचे दाखविले व कंपनीच्या महसुलात वाढ झाल्याचे दाखविले.

 आयपीओ विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी ३५ कोटी ५० लाख अमेरिकेत वळवले, तर ३० कोटी १५ लाख सिंगापूर येथील कंपनीत वळविल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले.

 याखेरीज आणखी २३ कोटी रुपयांचे व्यवहार करत ते पैसे कंपनीच्या एका संचालकाच्या हाँगकाँग व दुबई येथील कंपनीत फिरवले होते.

 याचा फटका समभागधारकांना देखील बसला होता. या प्रकरणी प्राथमिक तपासानंतर ईडीने या कंपनीच्या संचालकांची मालमत्ता जप्त केली आहे.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालय