मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 06:16 AM2024-11-17T06:16:15+5:302024-11-17T06:17:56+5:30
मानखुर्द पोलिसांनी सिनियर पीआय मधु घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली वाशी चेकनाक्याजवळ नाकाबंदी केली होती.
मुंबई : मानखुर्द येथे पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एका ट्रकमधून शुक्रवारी रात्री उशिरा ८,४७६ किलो चांदी जप्त केली. या चांदीची किंमत ७९ कोटी रुपये आहे. या प्रकरणी संबंधित ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर चांदी पकडली गेल्याने पोलिसांसह आयकर विभाग व निवडणूक आयोगाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. मानखुर्द पोलिसांनी सिनियर पीआय मधु घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली वाशी चेकनाक्याजवळ नाकाबंदी केली होती. त्या दरम्यान एका ट्रकचालकावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्या ट्रकची तपासणी केली असता चांदीचे घबाड आढळून आले.
दरम्यान, शीळ फाटा येथे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाला एटीएमच्या वाहनात शनिवारी ५ कोटी ५५ लाख रुपयांची रोकड सापडली. वाहनचालकाकडे कागदपत्रे नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी ते प्रकरण आयकर विभागाकडे सोपवले.
निवडणूक आयोगाकडून महिनाभरात ५५७ कोटींची मालमत्ता जप्त
राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेपासून निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत तब्बल ५५७ कोटी ७६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एवढी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सहा दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत ४९३ कोटी रुपये इतकी होती.
१५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या एका महिन्याच्या काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ७ हजार ८२० तक्रारी प्राप्त झाल्या.