तीन महिन्यात तब्बल ८४ लाख भारतीयांचा परदेशात प्रवास, भारतीय विमान कंपन्यांचा विक्रम
By मनोज गडनीस | Published: December 5, 2023 05:51 PM2023-12-05T17:51:31+5:302023-12-05T17:52:08+5:30
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत २० टक्के वाढ नोंदली गेली आहे.
मुंबई - गेल्या तीन महिन्यात परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, सरत्या तीन महिन्यांत तब्बल ८४ लाख ७५ हजार ३१२ भारतीयांनी परदेशी प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, परदेशातील प्रवासासाठी भारतीयांनी भारतीय विमान कंपन्यांना पसंती दिल्याचेही दिसून आले आहे. नागरी विमान महासंचालनालयाने या संदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत २० टक्के वाढ नोंदली गेली आहे. याच तिमाहीत देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यात ७३ लाख ६९ हजार ८०४ लोकांनी प्रवास केला आहे.