मुंबई : राज्यातील तीन वर्ष विधी अभ्यासक्रमासाठीच्या यंदा जवळपास ९५ टक्के जागा भरल्या आहेत. आता सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अर्ज भरता येणार आहे. राज्यात यावर्षी ३ वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या १८० महाविद्यालयांमध्ये २१,०७१ जागा उपलब्ध आहेत. यामधील १९,९७० जागांवर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
१,१०१ जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांमध्ये ईडब्लूएस प्रवर्गातील ६३९ जागांचा समावेश आहे. तर नियमित प्रवेशाच्या ४६२ जागांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तीन वर्षांच्या विधी अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी १९,३४१ जागा उपलब्ध होत्या. त्यातील १८,७४८ जागांवर प्रवेश घेतले होते.
१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार
यंदा राज्यातील एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत ही २४ सप्टेंबर होती. मात्र काही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नव्हते. प्रवेशासाठी जागाही रिक्त होत्या. त्यामुळे प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी महाविद्यालय आणि पालकांकडून केली जात होती. त्यानुसार सीईटी सेलने आता प्रवेशाला मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना २८ सप्टेंबर आणि २९ सप्टेंबरला अर्ज भरता येणार असून, गुणवत्ता यादी ३० सप्टेंबरला जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना १ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सीईटी कक्षाने एमएड, बीपीएड आणि एमपीएड अभ्यासक्रमांच्या प्रवेशालाही मुदतवाढ दिली आहे.