अमित शाह यांनी डोळे वर करताच...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'तो' हाराचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 04:51 PM2024-03-07T16:51:06+5:302024-03-07T16:52:41+5:30
भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले.
मुंबई - निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली नसली तर राजकीय पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावर असून औसा येथील सभेतून त्यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाला मोठा गर्व झाला आहे, या गर्वाचं घर आपण खाली करायचंय, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपात केवळ दोनच नेत्यांचं चालत असल्याचं म्हटलं. यावेळी, उद्धव ठाकरेंनी मोदींना स्वागतासाठीच्या पुष्पहारातही दुसरा माणूस चालत नसल्याचे सांगत राजनाथसिंह यांचे उदाहरणही दिले.
भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनात नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी, भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडून मोदींचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. त्यावेळी, अगोदर मोदींसह पुष्पहारात स्वत:ही आलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हळूच आपलं डोकं हारातून बाहेर काढल्याचं दिसून आलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. उद्धव ठाकरेंनी याच व्हिडिओचा उल्लेख करत भाजपाच्या या नेत्यांना मोठा गर्व झालाय, त्यांचं गर्वाचं घर आपण खाली करायचं असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटले.
औसा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदींची २०१९ ची आठवण सांगितली. यापूर्वीच्या निवडणुकीवेळी इथेच लातूरमध्ये ते मला माझा लहान भाऊ असं म्हणाले होते, आता कुठे गेले, असे म्हणत भाजपा नेत्यांना गर्व झाल्याचं ठाकरेंनी म्हटलं. यावेळी, माझं येथे स्वागत झालं, स्वागतासाठी मोठा पुष्पहार तुम्ही आणला होता, तेव्हा मी तुम्हाला येथील पदाधिकारी व नेत्यांना त्या हारामध्ये सामावून घेतलं. कारण, तुमच्यामुळे मी आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, यावेळी, त्यांनी युट्यूबवरील एका व्हिडिओचा संदर्भ देत भाजपाला टोलाही लगावला. त्यामध्ये, मोदींना स्वागतासाठी पुष्पहार घालताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही त्या हाराच्या आतमध्ये आले होते. पण, अमित शाह यांनी डोळे वर करताच, पुष्पहारामधून बाहेर पडले, असा किस्सा उद्धव ठाकरेंनी औसा येथील सभेत सांगितला.
काय होतं व्हिडिओत
भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. यावेळी, मोदींनी हात जोडून सर्वांना अभिवादन केले. दरम्यान, यावेळी मोदींसमवेतचा पुष्पहार देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या गळ्यात घातला होता. मात्र, केवळ पंतप्रधानांच्याच गळ्यात हा हार असल्याचे लक्षात येताच, त्यांनी आपलं डोकं अलगदपणे हारातून बाहेर काढलं. राजनाथ सिंह यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत हे दिसून येते. त्यानंतर, केवळ मोदींनाच तो पुष्हार घालून भाजपाचे हे दिग्गज नेते आणि मंत्री हात हाती घेऊन बाजुला उभे असल्याचे दिसून येते. व्हिडिओत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेही दिसून येतात.