Join us

Shivsena: 'फडणवीस कटुता संपवाच, लागा कामाला'; शिवसेनेची भाजपला अशीही टाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:28 AM

दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले.

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजपासून फारकत घेत शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का दिला होता. त्यामुळेच, मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीऐवजी विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीत बसावे लागले. शिवसेना आणि भाजपमधील दरीचा पहिला अध्याय येथे सुरू झाला. त्यानंतर, भाजपने सातत्याने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केले. अखेर, शिवसेनेतील मोठा गट फोडून भाजपने उद्धव ठाकरेंना खुर्चीवरुन खाली खेचल्याने शिवसेना आणि शिंदे गटात कटुता निर्माण झाली आहे. आता, ही कटुता संपविण्याच्या फडणवीसांच्या विधानाचे शिवसेनेकडून समर्थन होत आहे. 

दिवाळीनिमित्त फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला व काही विषयांवर ते मोकळेपणाने बोलल्याचे प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले. त्यावरुन, शिवसेनेनं अग्रलेखाच्या माध्यमातून फडणवीसांना साद घातली आहे. फडणवीस यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यावर महाराष्ट्राने विचार करायला हवा, असेही शिवसेनेनं म्हटलं आहे. 

शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला 'बासुंदी'चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार?, असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला विचारण्यात आला आहे. तसेच, शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले? असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!!, असे आव्हानच शिवसेनेनं फडणवीसांना दिलं आहे. 

फडणवीसांचा हा मोठेपणा

महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल. फडणवीस यांनी त्यांच्या मनातील वेदना उघड केली आहे. ते पुढे सांगतात, 'महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता आता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची अशी राजकीय संस्कृती नाही. राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांचे नेते एकमेकांशी बोलू शकतात. त्यामुळे ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.' श्री. फडणवीस यांनी हे सांगावे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असे शिवसेनेनं म्हटलं आहे.  

देशाच्या राजकारणातच आज कटुता

फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर आज देशाच्या राजकारणातच कटुता आली आहे. लोकशाहीचे संकेत काय आहेत? सत्ताधारी पक्ष कोणताही असो, त्याने विरोधी पक्षीय हे एकजात देशाचे शत्रू असल्याचे मानू नये. लोकशाहीत मतभिन्नतेला वाव असल्याने, भिन्न मत म्हणजे देशविरोधी मत असे ठरत नाही. म्हणून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकमेकांच्या किमान प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून काम केले पाहिजे. पण, आज हे वातावरण महाराष्ट्रात व देशातही राहिलेले नाही. 

भाजपने भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले

बेरजेचे राजकारण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांनी हे बेरजेचे राजकारण केले, ते मोडले कोणी? राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणाऱ्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून, ठाकऱ्यांपर्यंत ज्या भाषेचा वापर करतात त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल? तुम्ही केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून सरकार पाडले. शिवसेना फोडलीत. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जावे यासाठी पडद्यामागून राजकीय सूत्रे हलवली गेली, हे सर्व महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाउद्धव ठाकरेभाजपा