Eknath Shinde: मुख्यमंत्री होताच बंडखोर आमदार उदय सामंतना पहिलं गिफ्ट, एकनाथ शिंदेचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 03:13 PM2022-07-01T15:13:57+5:302022-07-01T15:23:04+5:30
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता
मुंबई - भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठीएकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा करताच, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या घोषणेनंतर बोलताना एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासमवेत असलेल्या 50 बंडखोर आमदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे म्हटले. तसेच, या आमदारांचे आभारही मानले. एकनाथ शिंदे गटात केवळ आमदारच नाही, तर मंत्रीही सहभागी झाले होते. शेवटच्या क्षणाला मंत्री उदय सामंत यांनी शिंदेगटात सहभागी होत शिवसेनेला मोठा धक्का दिला. आता, मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदेंनी उदय सामंतान सुखद धक्का दिला आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. हे महाविद्यालय सुरू करण्याची आग्रही मागणी शिवसेना आमदार उदय सामंत यांनी केली होती. पुढील वर्षापासून या नवीन शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेता येणे शक्य होणार आहेत. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. तर, उदय सामंत यांनीही ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्यासरकारी वैदयकीय महाविद्यालयाचा(Medical Collage)प्रश्न मार्गी लागणार, पुढच्या वर्षी होणार कॉलेज मध्ये प्रवेश, रत्नागिरीकरांचे वैदयकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होऊन आरोग्य सुविधेत होणार आमूलाग्र बदल,मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वैद्यकीय
— Uday Samant (@samant_uday) July 1, 2022
विभागाला आदेश.
शपथविधीनंतर नेमकं काय म्हणाले शिंदे
- राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
- महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.
- एकीकडे सत्ता पक्ष, मोठे-मोठे नेते आणि दुसरीकडे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता. अशावेळी या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. याच ताकदीने इतिहास घडविला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
- पूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
- भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही आभार. महाविकास आघाडीमुळे अनेक निर्णय घेता येत नव्हते.
कोकणातील #रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला दिलेले आहेत. #Ratnagiri#GovernmentMedicalCollege
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 1, 2022
कशामुळे बाहेर पडले उदय सामंत
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान घटक पक्षांकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचं उदय सामंत म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.