मुंबई : ग्राहकांना नुकसानभरपाईपोटी जारी केलेले वाॅरंट्स वसूल व्हावे, यासाठी महारेरा जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात असून, राज्यात अनेक ठिकाणी बिल्डरांच्या मालमत्ता जप्त करून लिलावांच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. आपली मालमत्ता जप्त होऊ नये, यासाठी बिल्डर नुकसानभरपाईची रक्कम भरत आहेत. शिवाय संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसानभरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत.
महारेराच्या कारवाईच्या भीतीपोटी या पद्धतीने ९ वाॅरंट्सपोटी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पुणे या भागातील ५ बिल्डर्सनी ८ कोटी ७२ लाख ७१ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. दरम्यान, यापूर्वी ११ विकासकांनी २० वाॅरंट्सपोटी ८.५७ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची देणी अशीच कुठल्याही लिलावाशिवाय दिली आहेत.
मुंबई शहर - समृद्धी डेव्हलपर्स आणि वंडरव्हॅल्यू रिॲलिटी या दोन बिल्डर्सचा समावेश आहे. त्यांनी ६.४६ कोटी रुपयांची भरपाई दिली असून, यातील वंडरव्हॅल्यू बिल्डरने एका ग्राहकाला ६ कोटी २६ लाखांची भरपाई दिली आहे. मुंबई उपनगर - रिलायन्स एंटरप्रायझेस आणि रूची प्रिया डेव्हलपर्स या बिल्डरने १ कोटी ८४ लाख ४६ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे. यात रिलायन्सने एका ग्राहकाला नुकसानभरपाईपोटी दिलेली रक्कम १ कोटी ७८ लाख आहे. पुणे - दरोडे जोग होम्स यांनीही त्यांच्या एका ग्राहकाला ४२ लाख २५ हजार रुपयांची भरपाई दिली आहे.