मुंबई : गेली अनेक वर्षे ‘मातोश्री’शी एकनिष्ठ असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. गोऱ्हे शिंदे सेनेत जाताच गेल्या विधिमंडळ अधिवेशनात त्यांच्यावर आलेला अविश्वास प्रस्ताव भाजपने मागे घेतला.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हेंचा प्रवेश हा ऐतिहासिक असल्याची भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली तर मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानेच कार्य करत असल्याने आपण हा निर्णय घेतला आहे, असे गोऱ्हे म्हणाल्या.
मी उपसभापतिपदावर असल्याने त्या वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. - नीलम गोऱ्हे, उपसभापती