Join us  

संदीप देशपांडे घरी येताच ठाकरे गटाच्या गटप्रमुखानं हातावरचं शिवबंधन सोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 9:13 PM

वरळीत सध्या मनसेचे संदीप देशपांडे आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यात थेट लढत होणार असल्याची चिन्हे आहेत. 

मुंबई - येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. त्याआधीच महायुती असो महाविकास आघाडी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात मनसेनं एक पाऊल पुढे टाकत थेट ४ जागांचे उमेदवार घोषित केलेत. त्यात वरळीतून संदीप देशपांडे हे निवडणूक लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे. संदीप देशपांडे यांनीही वरळीतील विविध भागात मतदारांच्या थेट गाठीभेटीवर भर दिला आहे.

संदीप देशपांडे वरळीत घरोघरी जात प्रचार करत असतानाच त्यांच्यासमोर असा प्रकार घडला ज्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. वरळीतील नागरिकांच्या भेटीगाठी घेत संदीप देशपांडे त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यात आज ते घरोघरी जात असताना तिथे ठाकरे गटाचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांच्याही घरे पोहचले. त्यावेळी निलेश ठोंबरे घरी होते. 

ठोंबरे यांच्यावर वरळीतील गटप्रमुखपदाची जबाबदारी आहे. लोकसभेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचं काम केले. मात्र ज्यावेळी संदीप देशपांडे हे ठोंबरे यांच्या घरी आले तेव्हा निलेश ठोंबरे यांनी त्यांच्या हातावरचं शिवबंधन सोडलं आणि तिथेच मनसेत प्रवेश करत असल्याचं जाहीर केले. शिवबंधन सोडून ऑन द स्पॉट मनसेत प्रवेश करणारा हा पक्षप्रवेश वरळीत चांगलाच चर्चेत आला. 

संदीप देशपांडे ठोंबरे यांच्या घरी पोहचले तेव्हा निलेश याने म्हटलं की, मी सांगितलं होतं जेव्हा तुम्ही घरी येणार तेव्हा हे बंधन सोडणार त्यामुळे तुम्ही आज घरी आलात त्यामुळे हे बंधन मी सोडतोय. यावेळी निलेश ठोंबरे यांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून वरळीत राजकारण तापलं आहे. त्यात जांभोरी मैदानात ठाकरे गटाचे आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यामुळे येत्या विधानसभेत वरळीत मनसेचा थेट सामना विद्यमान आमदार आदित्य ठाकरेंची होणार आहे. 

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेशिवसेनाआदित्य ठाकरे