मुंबई : कोरोना काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वितरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना बुधवारी ईडीने चौकशीसाठी समन्स जारी केले. मात्र, ते पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त असल्याने ईडी चौकशीला येऊ शकणार नसल्याचे सांगत त्यांच्या वकिलाने या प्रकरणी चौकशीसाठी ईडीकडे मुदतवाढ मागितली.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मुदतवाढ दिली अथवा नाही, या संदर्भात माहिती मिळू शकली नाही. उल्लेखनीय म्हणजे कीर्तिकर यांना बुधवारीच ठाकरे गटातर्फे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, कीर्तिकर यांच्या दापोली येथील शिर्दे गावातील घरावरही ईडीने छापेमारी केल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोरोना काळात झालेल्या या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर-२०२३ मध्ये गुन्हा नोंदवला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, बाळा कदम, राजीव साळुंखे तसेच मुंबई महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची या प्रकरणी चौकशीही करण्यात आली होती. या प्रकरणी एकूण ६ कोटी ३७ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्याच दरम्यान, अमोल कीर्तिकर यांचीही पोलिसांनी सहा तास चौकशी केली. मुंबई पोलिसांच्या या तक्रारीच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली आहे.
आठवडाभर वाट पाहून निर्णय घेऊ : संजय निरूपम मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत कीर्तिकर यांचे काम करणार नसल्याचे स्पष्ट केले. आठवडाभर वाट पाहून पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे सांगत पक्ष नेतृत्वाला इशारा दिला. खिचडी घोटाळ्यात व ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या अमोल कीर्तिकर यांचे मी आणि माझे सहकारी कदापि काम करणार नाही, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.