Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल करताच डॉक्टरने पैसे केले परत; पैसे पुन्हा कंपनीच्या पदरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 05:55 IST

कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविड केंद्राचे कंत्राट सुजीत पाटकर व त्यांच्या भागीदारांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला मिळाले होते.

मुंबई : कोरोना काळात मुंबईच्या कोविड केंद्रात झालेल्या कथित घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. हेमंत गुप्ता यांनी त्यांच्या वाट्याला आलेले एक कोटी रुपये कंपनीला परत केल्याचे वृत्त आहे.

कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविड केंद्राचे कंत्राट सुजीत पाटकर व त्यांच्या भागीदारांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला मिळाले होते. मात्र, या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ईडीने सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले असून यापैकी एक आरोपी डॉ. हेमंत गुप्ता हे आहेत. एकूण ३२ कोटी रुपयांच्या कंत्राटापैकी डॉ. गुप्ता यांना २ कोटी ८५ लाख रुपये मिळाल्याचे समजते. मात्र, या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर डॉ. गुप्ता यांनी तातडीने एक कोटी रुपये कंपनीला परत केल्याची माहिती आहे.

कंत्राट बनाव रचून मिळवल्याचा ईडीचा दावा

डॉ. गुप्ता हे लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या चार भागीदारांपैकी एक भागीदार आहेत. कोविड केंद्राचे काम मिळाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी सुजीत पाटकर व डॉ. गुप्ता यांनी दहिसर व वरळी येथील जम्बो कोविड केंद्र त्यांच्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या तुलनेत केवळ ४० टक्के क्षमतेमध्ये केंद्र चालविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर, ६० टक्के कर्मचारी हे केवळ कागदावरच होते. हे कंत्राट या कंपनीने बनाव रचून मिळवल्याचा आरोप ईडीने ठेवला असून या प्रकरणात खोटी बिलेदेखील सादर झाल्याचा ईडीचा दावा आहे. या कोविड केंद्रासाठी ज्या वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांची नावे कंपनीने सादर केली ती बोगस होती किंवा त्यांनी त्या केंद्रामध्ये कधीही काम केले नसल्याचेदेखील ईडीचे म्हणणे आहे.