गुन्हा दाखल होताच माजी आमदार नरेंद्र मेहता पत्नीसह झाले 'नॉट रिचेबल'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 06:58 AM2022-05-22T06:58:06+5:302022-05-22T06:59:03+5:30
अपक्ष नगरसेवक म्हणून २००२ मध्ये निवडून आलेले मेहता हे २०१७ पर्यंत नगरसेवक होते
मीरा रोड : पदाचा दुरुपयोग करून ८ कोटी २५ लाख ५१ हजारांची अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करताच भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता व त्यांची पत्नी सुमन मेहता नॉटरिचेबल असल्याचे सांगण्यात येते.
अपक्ष नगरसेवक म्हणून २००२ मध्ये निवडून आलेले मेहता हे २०१७ पर्यंत नगरसेवक होते. या दरम्यान महापौर, विरोधी पक्षनेता, प्रभाग समिती सभापती राहिले. २०१४ ते २०१९ दरम्यान ते भाजपचे आमदार होते. २००२ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून येताच काही महिन्यांत अनधिकृत बांधकामप्रकरणी लाच घेताना मेहतांना रंगेहात अटक केली होती. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
२०१५-१६ दरम्यान तत्कालीन लोकायुक्त एम. एल. ताहिलयानी यांनी मेहतांची भ्रष्टाचार व अपसंपदाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू केली होती. अखेर सहा वर्षांनी एसीबीचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली १९ मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमनुसार नरेंद्र व सुमन मेहता यांच्यावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच मेहता हे नॉटरिचेबल झाले. याबाबत अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांनी कागदपत्रे जप्त केल्यास दुजोरा दिला. मात्र, अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.