लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘काळ आला होता; पण वेळ आली नव्हती’ या म्हणीचा प्रत्यय मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाच्या कुटुंबीयांच्या घरी पहावयास मिळाला. नवीन सिलिंडर लावून पोलीस शिपाई कामावर गेले. कुटुंबीयही दर्शन करून घरी परतले आणि दरवाजा उघडताच सिलिंडरचा स्फोट झाला. मात्र, दैव बलवत्तर म्हणून ते कुटुंबीय थोडक्यात बचावले आहे. परंतु घर उद्ध्वस्त झाले आहे.
मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस शिपाई पदावर काम करणारे विजय गोडेकर यांच्या कुटुंबीयांवर हे संकट ओढावले होते. ते एमआरए पोलीस वसाहतीत राहतात. विजय गोडेकर यांनी २२ जुलै रोजी दुपारी १२च्या सुमारास गॅस सिलिंडर बदलला होता. पण तो कसा लीक झाला हे त्यांनाही समजले नाही. त्यानंतर ते कामावर निघून गेले. आई, पत्नी आणि दोन मुले घरातच होती. त्यानंतर, सर्वजण महालक्ष्मी मंदिरात गेले. सहाच्या सुमारास घरी परतले. त्यांच्या पत्नी दरवाजा उघडून आता गेल्या. गॅसचा वास आल्याने त्या बाहेर येणार तोच स्फोट झाला. आणि क्षणात होत्याचं नव्हतं झाले. यामध्ये त्यांच्या मांजरीचे तोंड भाजले आहे. शेजारच्यांनी घराजवळ दिवा लावला होता. घरी आल्यानंतर दरवाजा उघडताच गॅसचा आणि पेटत्या दिव्याचा संपर्क होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत त्यांच्या आईच्या साडीला आग लागताच स्थानिकांनी तात्काळ पुढाकार घेत आग विझवली. या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
आयुक्तांनी घेतली कुटुंबीयांची भेटपोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी, शनिवारी कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच त्यांना मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.