मुंबई : मुख्यमंत्र्यांना मुंबईतला कचरा आणि अस्वच्छतेची झाडाझडती घेतल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. पालिका आयुक्तांनी तातडीची बैठक घेत अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सहआयुक्त, उपायुक्त आणि अभियंत्यांना स्वच्छतेवर नियमित कार्यवाहीच्या सूचना दिल्या.यात हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे पुढच्या काही दिवसांत तरी मुंबई स्वच्छ आणि चकचक दिसली तर मुंबईकरांना आश्चर्य वाटायला नको.
मुख्यमंत्र्यानी स्वच्छतेच्याबाबतीत हयगय नको असे स्पष्ट केल्यानंतर मुंबईतल्या प्रमुख परिसर व रस्त्यांप्रमाणेच इतरही सर्व लहानसहान परिसर, रस्ते, गल्ली आदी ठिकाणी देखील स्वच्छतेची कामे दररोज योग्यरितीने होणे आवश्यक आहे. मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये,असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. आवश्यकता असल्यास परिसरनिहाय पथक गठीत करुन कार्यवाही करा, त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रसाधनगृहांची दिवसातून किमान दोन वेळा नियमित स्वच्छता करा, असे ही स्पष्ट केले आहे.
...तर कारवाई होणार शहरातल्या स्वच्छतेप्रमाणे सर्व अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज हटविण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी अशा सूचना ही आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्वच्छतेच्या या कामकाजामध्ये अधिकारी किंवा कर्मचारी कडून कुचराई केल्याचे आढळल्यास त्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद देखील आयुक्तांनी दिली आहे.
या स्वच्छतेच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी सहआयुक्तांपासून ते सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता यांनी दररोज सकाळ सत्रात एक तास आणि सायंकाळ सत्रात एक तास असे किमान दोन तास प्रत्यक्ष भेटी देण्याची सूचना केल्या आहेत.