Join us

"कधी कधी असं वाटतं..." मातोश्रीवर भेट नाकारताच कराळे मास्तरांची भाषा बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 6:53 PM

कराळे मास्तरांना मातोश्रीवर भेट नाकारल्याने त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर बंडखोर आमदारांचा एक गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एक गट असे दोन गट निर्माण झाले. राजकीय लढाईसोबत शिवसेना कोणाची ही कायदेशीर लढाईही सुरू झाली. या लढाईत शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारली. दरम्यानच्या काळात कार्यकर्तेही दोन गटात विभागले गेले. त्यातून, शिवसेना शिंदे गटावर गद्दार गद्दार म्हणून अनेकांनी हल्लाबोल केला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्यांनीही शिवसेना उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती दाखवत शिंदेंवर हल्लाबोल केला. त्यामध्ये, खदखद फेम कराळे मास्तरांचाही समावेश होता. मात्र, कराळे मास्तरांना मातोश्रीवर भेट नाकारल्याने त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.

आपल्या हटके विदर्भीय स्टाईलने शिकविण्यासाठी सोशल मीडियावर ‘खदखद’ मास्तर म्हणून प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. समाज माध्यमांवर त्यांचे लाखो फालोअर्स असून कराळे यांच्या व्हीडीओंची सर्वत्र चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही केली होती. तर, आता लोकसभा निवडणुकांच्या इच्छुक उमेदवारांपैकी आपण एक असल्याचं कराळे मास्तरने म्हटले आहे. 

नितेश कराळे हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ओएसडींच्या माध्यमातून मुंबईतील मातोश्री बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होते. आपण, सकाळी ७ वाजता मातोश्रीवर पोहोचलो, पण अद्यापही आपणास भेट देण्यात आली नाही. विशेष म्हणजे शिवसेना व शिंदे यांच्यातील वादानंतर मी अनेकदा व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेनेबद्दल सहानुभूती दर्शवली आहे. नुकतेच विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर व्हिडिओ बनवून कायदेशीररित्या त्याची समीक्षाही केली. या व्हिडिओला ६०-साठ लाख व्हूज मिळाले आहेत. त्याच अनुषंगाने मला उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ५ मिनिटे चर्चा करायची होती. त्यासाठी, म्हात्रेंचा संपर्क मिळाला, त्यांच्याशी फोनवरुन संपर्क झाल्यानंतरही आज त्यांनी माझे फोन घेतले नाही. याउलट मातोश्रीबाहेर त्यांची भेट झाली. मात्र, तरीही त्यांनी मला उद्धव ठाकरेंची भेट नाकारली. 

मी तुमच्या बाजुने एवढे सहानुभूतीचे व्हिडिओ घेतो. भाजपला शिंगावर घेणारा एवढा कोणताच नेता नाही. त्यातूनच मी सहानुभूतीची चर्चा करायला आलो होतो. पण, मला इथं जाणवलं की, बरेच शिवसैनिक इथं भेटायला येतात, त्यांना बसायला जागा नाही, चहा-पाण्याची व्यवस्था नाही, लघवीला जायची जागा नाही. सर्वसामान्य माणूस बाळासाहेब ठाकरेंचं नाव ऐकून, त्या श्रद्धेनं इथं येतो. आम्हालाही शिवसेनेबद्दल निष्ठा आहे, जे निष्ठा सोडून गेले त्यांनी चुकीचं केलं. पण, इथं आल्यावर दिवसभरातील ५ मिनिटं हे मला भेटले नाहीत. पुढील महिन्यात तुम्ही आदित्य ठाकरेंची भेट घ्या, असे ते म्हणाले. मला दिवसभरातील ५ मिनिटांचा वेळ मिळाला नाही, माझे व्हिडिओ बरेच लोकं पाहातात, राजकीय नेते विधानसभेत त्यावरुन प्रश्न विचारतात. मग, माझ्यासारख्यांसाठी ५ मिनिटांचा वेळ नाही. तर, शिवसैनिकांसाठी वेळ आहे का, मग हा पक्ष वाढेन का?, असा प्रश्न कराळे मास्तरांनी विचारला. तसेच, कधी कधी असं वाटतं हे जे ४० आमदार पळून गेले हे योग्य होते का, असंही कराळे मास्तर म्हणाले. 

बाळासाहेब ठाकरे सर्वात पहिले शिवसैनिकांना भेटायचे, नंतर जिल्हा संपर्क प्रमुखांना भेटायचे. मग, मातोश्रीतून ही प्रायोरिटी संपली का?, असा सवाल कराळे मास्तरांनी उपस्थित केला. तसेच, मुंबईतील मातोश्रीबाहेरून त्यांनी भेट नाकारल्याबद्दलचा संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :शिवसेनाकाँग्रेसउद्धव ठाकरेमुंबई