उच्च न्यायालयाचे फटकारे पडताच, खड्डे बुजविण्यासाठी पालिकेची धडपड!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 12:08 PM2023-08-28T12:08:00+5:302023-08-28T12:08:33+5:30

मुंबईतील सर्वात महत्त्वाचे असे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग खड्ड्यांनी भरले आहेत. मात्र विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत असूनही त्यासाठी पालिकेला जबाबदार ठरविले जाते.

As the High Court reprimands, the municipality struggles to plug the potholes | उच्च न्यायालयाचे फटकारे पडताच, खड्डे बुजविण्यासाठी पालिकेची धडपड!

उच्च न्यायालयाचे फटकारे पडताच, खड्डे बुजविण्यासाठी पालिकेची धडपड!

googlenewsNext

मुंबई : खड्ड्यांवरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकांसह अन्य पालिकांवर ताशेरे ओढल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची धडपड सुरू झाली. याचाच एक भाग म्हणून पालिकेने पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्ड्यांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करून दोन्ही मार्गांसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमले आहेत.

दरम्यान, जबाबदारी निश्चित केल्यामुळे पहिल्यांदाच हे रस्ते ताब्यात घेतल्यानंतर योग्य रीतीने काम सुरू झाले असून, यामुळे खड्डे आणि वाहतूक कोंडीतून सुटका होत असल्याचे वाहनचालक-प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुंबईतील सर्वात महत्त्वाचे असे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग खड्ड्यांनी भरले आहेत. मात्र विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत असूनही त्यासाठी पालिकेला जबाबदार ठरविले जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात खड्ड्यांबाबत पालिकेची भूमिका मांडताना मुंबईतील रस्ते पालिकेच्या ताब्यात द्या, तीन वर्षांत पालिका हे रस्ते खड्डेमुक्त करेल, असा दावा करीत हे रस्ते आपल्या ताब्यात घेतले होते. 

१५ प्राधिकरणाच्या ताब्यात रस्ते
मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत सुमारे २ हजार किमीचे रस्ते आहेत. याशिवाय मुंबईत ‘एमएमआरडीए’, ‘एमएसआरडीसी’, ‘एमएमआरसीएल’, ‘पीडब्ल्यूडी’, ‘एमबीपीटी’, ‘एएआय’, ‘बीएआरसी’ अशा विविध १५ हून अधिक प्राधिकरणांचे शेकडो किमी रस्ते पालिका क्षेत्रात येतात.

गणेशोत्सवात कोणतेही विघ्न नको
गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा विभाग स्तरावर  करावी, रस्त्यावर खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी यापूर्वीच दिल्या आहेत.  

 अशी झाली कार्यवाही
  पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग ३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आले. सुमारे २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तर शीव ते मुलुंड हा पूर्व द्रुतगती महामार्ग हा १८.६ किलोमीटर लांबीचा असून, ६० मीटर रुंद असा आहे.
   या दोन्ही मार्गांवरील पावसाळापूर्व व पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी खराब भागाचा विकास करण्यासाठी तसेच सेवा रस्ते, पदपथ यांची देखभाल, गटारांवरील झाकणे बसवण्याचे काम करण्यात येत आहे.

Web Title: As the High Court reprimands, the municipality struggles to plug the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.