मुंबई - शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमध्ये शिवसेना नेत्यांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धाच सुरू आहे. त्यातच, इतरही पक्षातील कोणते नेते, पदाधिकारी आपल्या शिवसेनेत प्रवेश करत असतील तर त्यांचं स्वागतच होत आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठीही अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता, नाशिकमधील अद्वय हिरे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला. गद्दार गेले म्हणून हिरे आले, अशा शब्दात त्यांनी अद्वैय हिरेचं स्वागतं केलं.
भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी अद्वय हिरे आज मुंबईत पोहोचले होते. मुंबईतील शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित अद्वय हिरे यांचा प्रवेश झाला. त्यामुळे दादा भुसे यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे. दरम्यान, राज्यात झालेली राजकीय उलथापलाथ आणि शिंदेगट व भाजपची युती अद्वैय हिरेंना अडचणीची ठरत होती. त्यामुळेच, त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन बांधलं आहे. शिवसेनेकडून अद्वय हिरे यांना पुढील काळात दादा भुसेंविरोधात उमेदवारी करायची आहे, त्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी स्थिती असतांना आता शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच हिरे विरुद्ध भुसे असा सामना पाहायला मिळू शकतो.
पक्षप्रवेशानंतर हिरेंचा भाजपवर निशाणा
भाजपात व्यक्तीस्वातंत्र्य नाही. तिथे बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. आम्ही सभा घेतो तेव्हा त्या सभेच्या दिवशी काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे सांगायला सकाळी ७ वाजता एक काळी टोपी आमच्या घरी येते. आणि ती काळी टोपी सांगते तेच आम्हाला बोलावं लागते. आमचे सगळं स्क्रिप्टेड असतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कागद धरल्याशिवाय बोलत नाहीत. सोशल मीडियावर काय टाकायचं हेदेखील त्यांच्याकडून आलेले असते. फक्त बळी कोणाचा द्यायचा ते त्यांच्या हातात असते असा खुलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेल्या भाजपा नेते अद्वय हिरे यांनी केला आहे.
हिंरेंच्या शिवसेना प्रवेशानंतर अद्वय हिरे यांना डिवचण्यासाठी शिंदे गटाकडून त्यांच्याच जुन्या पोस्ट काढून व्हायरल केल्या आहेत. त्यामध्ये अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याच पोस्टचे मिम्स बनवत दादा भुसे समर्थकांनी सोशल मीडियावर अद्वय हिरे यांना डिवचण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, 'ज्या ठिकाणचे कुंकू लावले त्या ठिकाणी सुखाने नांदावे' असा चिमटा दादा भुसेंनी हिरेंना काढला आहे.