शहापूर : तालुक्यातील आटगाव-आसनगाव येथील १० हजार लघु उद्योग गुजरात राज्यात स्थलांतरित झाले आहेत. पाणी टंचाई आणि सतत होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे उत्पादनांवरच गदा आल्याने आसनगाव औद्योगिक वसाहतीला अखेरची घरघर लागली आहे. प्लॅस्टिकच्या सर्व प्रकारच्या उत्पादने तसेच साबण, कपडे धुण्याची पावडर, टॉयलेट व बाथरूम क्लीनर, वह्या, पुस्तकांचे छापखाने आणि स्त्रियांच्या वापरातील अत्यंत किमती तलम रेशमी निर्यातक्षम वस्त्रांची मोठी औद्योगिक वसाहत म्हणून आसनगाव एमआयडीसी ओळखली जात होती. या औद्योगिक वसाहतीला ग्रामपंचायतीतर्फे पाण्याची कुठलीही उपलब्धता नाही. खाजगी टँकरची मागणी करून उद्योगांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते. त्यामुळे या वसाहतीमध्ये टँकर लॉबीची चांगलीच चलती आहे. विजेच्या सततच्या लपंडावामुळे येथे उत्पादनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाणी आणि वीज या मूलभूत गरजांचेच संकट जाणवू लागल्याने १९८२ पासून रडतरखडत उद्योग केलेल्या १० हजार त्रस्त व्यावसायिकांनी थेट गुजरातला स्थलांतर केले आहे. औद्योगिक वसाहतीच्या वीजपुरवठ्यासाठी मंजूर केलेल्या स्वीच सेंटरचे बांधकाम अजूनही रखडले आहे. करोडो रुपयांचा महसूल मिळत असूनही राज्य शासन व स्थानिक संस्था यांच्याकडून उद्योगांना कुठल्याच सुविधा पुरविलेल्या नाहीत. आसनगावमधून हजारो व्यावसायिकांनी गुजरातला स्थलांतर केले आहे. औद्योगिक वसाहतीत पाणी, विजेचे मोठे संकट असल्याने ही वेळ आली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. - सुनील विशे, व्यावसायिक
आसनगाव:१० हजार उद्योग गुजरातमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2015 11:32 PM