मुंबई - राज्यात सत्तांतराचं महानाट्य घडत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे हे रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे, राज्यातील राजकीय घडामोडींसंदर्भात राज यांनी अद्याप आपली भूमिका किंवा प्रतिक्रियाही दिली नाही. मात्र, नवीन सरकारचं अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी मोठं कौतुक केलं होतं. त्यानंतर, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची शिवतिर्थ बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तर, आज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी राज यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीत आता मनसेही सक्रीय झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहे. अलीकडेच राज यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर विश्रांती घेऊन मनसे महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही राज ठाकरेंनी गेल्या आठवड्यात घेतली होती. तर, काही दिवसांपूर्वी बंडखोर आमदार सदा सरवणकर हेही राज यांची भेट घेऊन गेले होते. आता, आशा भोसले यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, राज यांच्या घरातील आशा भोसलेंचा एका फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राज यांच्या हातात काठी दिसत असून त्यांनी आशाताईंच्या खांद्यावर हात ठेवला आहे.
दरम्यान, मंगेशकर कुटुंबीय आणि राज ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध आहेत. लतादिदींसोबतही राज यांची चांगली मैत्री होती. ते आवर्जून लतादिदींच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार घेत. लतादिदींच्या निधनानंतर आता आशाताईंनी राज यांची शिवतिर्थ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मनसेच्या अधिकृत अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
फडणवीसांनीही घेतली भेट
नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन बैठक घेतली होती. जवळपास या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये २ तास वैयक्तिक चर्चा झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आले असले तरी राज्यातील राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर मनसे-भाजपा एकत्र येण्याबाबत पुन्हा चर्चेला उधाण आले.