मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या ९०व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘बुक माय शो’ या ॲपवर ‘लिव्हिंग लिजंड आशा भोसले विथ ३५ ग्रेट म्युझिशियन्स’ अशा आकर्षक शीर्षकाची जाहिरात अलीकडेच झळकली. आशाताईंच्या चाहत्यांनी ही सुवर्णसंधी साधण्यासाठी तिकिटांच्या खरेदीचा सपाटा सुरू केला. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला. या कार्यक्रमाला आशाताई उपस्थितच राहणार नसल्याचे समजल्याने खट्टू झालेल्या चाहत्यांनी ‘बुक माय शो’ वाल्यांकडे पैसे परत मिळावे यासाठी तगादा लावला, परंतु या ॲपवर पैसे रिफंडची व्यवस्थाच नसल्याचे उघड झाले आहे.
‘आशा भोसले ३५ महान संगीतकारांसमवेत’ अशा आशयाची जाहिरात ‘बुक माय शो’वर दाखवली जात असून १० सप्टेंबरला वांद्र्याच्या रंगशारदामध्ये कार्यक्रम होणार असल्याचे नमूद आहे. कार्यक्रमासाठी ४०० रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंतचे तिकीट दर लावण्यात आले आहेत. मालाडच्या राजेश आणि रूपाली शेवडे तसेच पार्ल्याचे तुषार श्रोत्री यांसारख्या आशाताईंच्या अनेक चाहत्यांनी तिकिटे खरेदी केली, परंतु आशा भोसले त्यांचा वाढदिवस दुबईमध्ये साजरा करणार आहेत.
त्या १२ सप्टेंबर रोजी भारतात परतणार असल्याचे समजताच गोंधळ झाला. ‘बुक माय शो’कडे चौकशी करताच, त्यांनी आशा भोसले रंगशारदा येथील कार्यक्रमात गाणार असल्याचे जाहिरातीत कुठेही म्हटले नसल्याचे सांगितले. भ्रमनिरास झालेल्या चाहत्यांनी ‘बुक माय शो’कडे तिकिटाचे पैसे परत मागितले असता रिफंडबाबत त्यांनी कानांवर हात ठेवले. पैसे परत मिळतील असे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले असले तरी गेल्या दोन दिवसांपासून रिफंड मिळाले नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत.
रसिकांची दिशाभूल करण्याचा प्रकाररसिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. ‘बुक माय शो’सारखी मातबर संस्था सोबतीला असल्याने आणि आशा भोसलेंवरच्या प्रेमामुळे लोकांनी तिकिटे खरेदी केली. माझ्यासह अनेक रसिकांनी महागडी तिकिटे बुक केली. मात्र, आता ते पैसे परत करण्यास नकार देत आहेत. - तुषार श्रोत्री
आम्ही फक्त तसे टायटल दिले आशा भोसले येणार आहेत किंवा गाणार आहेत, असे आम्ही कुठेही म्हटलेले नाही. आम्ही फक्त तसे टायटल दिले आहे. अतिरिक्त माहितीमध्येही कोण गाणार आहे ते स्पष्ट केले. माझ्यापर्यंत कुणाचीही तक्रार आलेली नाही. कुणाची तक्रार असल्यास किंवा पैसे परत हवे असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा. ‘बुक माय शो’वरही तिकीट रद्द केल्यास पैसे रिफंड करण्याची सूचना दिली आहे. - पुनीत शर्मा, कार्यक्रमाचे आयोजक