मुंबई - ‘केवळ आश्वासन नको, ताबडतोब शासन निर्णय जाहीर करा’, ‘जीआरचा कागद घेतल्याशिवाय आम्ही मैदान सोडणार नाही’, अशा मागण्या करत राज्यातील हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. उन्हामुळे उष्माघाताच्या त्रासाने सहा महिला मंगळवारी आजारी पडल्या, तर अनेकांची तब्येत बिघडली आहे. मैदानात प्रचंड गैरसोय असतानाही त्यांचे आंदोलन सुरू आहे. परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. आमचा जीव गेल्यावर सरकार शासननिर्णय काढणार आहे का?, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
आशा सेविकांना ७ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना १० हजार रुपये आणि सर्वांना २ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र, अद्याप तसा शासन निर्णय जाहीर झाला नसल्याने काही दिवसांपासून ऊन आणि थंडीची पर्वा न करता जवळपास ३० हजारांहून अधिक आशासेविका व गटप्रवर्तक महिला आंदोलन करत आहेत.
सध्या अत्यंत तुटपुंज्या मानधनावर त्या काम करत आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये आशासेविकांनी बेमुदत संप पुकारला होता. तेव्हा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आशासेविकांना ७ हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना १० हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. शिवाय सर्वांना २ हजार रुपये दिवाळी भेट दिली होती. त्याचा महिनाभरात शासन आदेश जारी केला जाईल, असे आश्वासन दिले होते. तीन महिने उलटूनही संबंधित शासन आदेश अजून निघालेला नाही.
मैदानात उभारल्या राहुट्याआंदोलक महिला रात्री सीएसएमटी रेल्वे टर्मिनस आणि चर्चगेट रेल्वे स्थानकावर आसरा घेतात. काहींनी मैदानात साड्या आणि चादरीने थंडी, उन्हापासून बचाव करण्यासाठी राहुट्या उभारल्या आहेत. आझाद मैदान, सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात खाण्यापिण्याची सोय नसल्याने महिलांची धावाधाव सुरू आहे. मिळेल तसे खाऊन त्या आंदोलन करत आहेत. रात्री अनेकांना उपाशी राहण्याची वेळ येते. मैदानात डास आणि घुशी, उंदरांचा त्रास होत आहे.