मानधनवाढीसाठी मंत्रालयावर आशा सेविका धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 05:14 AM2019-08-06T05:14:25+5:302019-08-06T05:14:33+5:30
७ ऑगस्टला करणार जेल भरो आंदोलन
मुंबई : प्रलंबित मानधनवाढीच्या मुद्द्यासाठी राज्यभरातील आशा सेविका ७ ऑगस्टला मंत्रालयावर जेल भरो आंदोलन करणार आहेत. केंद्र सरकारने आशा, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ केली आहे. मात्र राज्य शासनाने अजूनही या वाढीला हिरवा कंदील दाखविला नाही. याविरोधात महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आशा सेविका मंत्रालयावर धडकणार आहेत.
‘महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती’चे अध्यक्ष एम.ए. पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने मानधनात भरीव वाढ केली, पण ही वाढ देण्यास राज्य सरकार सातत्याने टाळाटाळ करत आहे. त्यामुळेच मंत्रालयावर जेल भरो आंदोलन करण्यात येईल. यात राज्यभरातील ६४ हजार आशा व अंगणवाडी सेविका सहभागी होतील.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सचिव राजेश सिंह म्हणाले की, राज्यातील आशा सेविकांना अन्य राज्यांच्या तुलनेत खूपच कमी मानधन आहे. केंद्राने मागील वर्षी त्यांच्या मानधनात वाढ केली. मात्र ती अद्याप लागू झालेली नाही. याबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी सविस्तर चर्चाही करूनही फक्त आश्वासनेच मिळाली.